सांगली : शहरातील मार्केट यार्ड परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. स्वप्नील वसंत जाधव ( वय २४, रा. तिसंगी ता. कवठेमहांकाळ) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ६० हजार रुपयाचे पिस्तूल, चारशे रुपयाची दोन काडतुसे आणि दोनशे रुपयांची रोकड असा ६० हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी पथक तयार केले आहे. या पथकातील कर्मचारी शहरात गस्तीवर असताना, त्यांना मार्केट यार्डमधील वैरण बाजारजवळ एक तरुण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून त्यास ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळाली. हे पिस्तूल विक्रीसाठी आणले असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार त्याच्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.