कुपवाड : शहरातील अक्षय विलास पाटील (वय २६, रा. कापसे प्लाॅट, कुपवाड) या तरुणावर सोमवारी रात्री अज्ञातांनी काठीने हल्ला केला. जखमीवर मिरजेतील एका खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात उशिराने नोंद झाली आहे.
अक्षय पाटील हा माधवनगरमधील एका व्यापाऱ्याकडे कामाला आहे. सोमवारी रात्री तो कामावरून मोटरसायकलवरून घरी येत होता. बुधगाव ते कुपवाड रस्त्यावरील ओढ्याजवळ आला असता पाठीमागून दोन मोटरसायकलींवरून संशयित तरुण आले. त्यांनी पाटील याला गाडी थांबवायला सांगितले. गाडी थांबवताच संशयितांनी त्याला काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत पाटील गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच संशयित हल्लेखोर काठ्या घटनास्थळी टाकून मोटरसायकलवरून फरार झाले.
जखमी पाटील यांनी ही माहिती नातेवाइकांना दिली. नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला मिरजेतील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस दप्तरी दोन अज्ञातांनी हल्ला केल्याची नोंद झाली आहे. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याची माहिती समजू शकली नाही. पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.