येथील सागरेश्वर सूतगिरणीत अक्षय माळी नोकरीस होता. सूतगिरणीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या कडेगाव तलावातील विद्युत मोटारीमध्ये बिघाड झाला होता. ही मोटार दुरुस्तीसाठी सूतगिरणीचे कर्मचारी बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कडेगाव तलावाकडे गेले होते.
पाण्यात पोहण्याची साधने असताना अक्षय याने यापैकी काहीही न घेता थेट पाण्यात उडी घेतली आणि तो तीनशे फूट आत तलावातील पाण्यात पोहत गेला. त्यानंतर त्याला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. यावेळी सूतगिरणीच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु यश आले नाही. मृतदेह बाहेर काढण्यासाठी सांगली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमच्या पाणबुडीनी पाण्यात बुडालेला अक्षयचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत संजय महादेव पिसे (रा. कडेगाव) यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे हे करीत आहेत.
चाैकट
बेफिकिरी नडली
पाण्यात पोहण्याची साधने असूनही अक्षयने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याने बेफिकिरी दाखविल्याने पट्टीचा पोहणारा असूनही त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने कडेगाव व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो : २४अक्षय माळी