कुपवाड : बहीणीबरोबर प्रेमप्रकरण असल्याच्या राग मनात धरून बामणोली, दत्तनगर ( ता. मिरज) येथील ओम श्रीधर देसाई (वय १९ रा.दत्तनगर, बामणोली) या युवकाचा संशयित ओंकार जावीरसह अन्य तिघा संशयिताकडून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. रविवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास दत्तनगर मधील खुल्याजागेत ही घटना घडली. या घटनेची कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी जावीरसह त्याच्या इतर तिघा मित्रावर गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये ओंकार निलेश जावीर (वय २०), रोहित बाळासाहेब केंगार (वय १८), सोहम शहाजी पाटील ( वय २०), ज्ञानेश्वर पाटील (वय २०,रा. चौघेही दत्तनगर,बामणोली) यांचा समावेश आहे. यापैकी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून ओंकार जावीर आणि सोहम पाटील याला अटक केली आहे. तर कुपवाड पोलीसांनी रोहित केंगार याला अटक केली आहे. ज्ञानेश्वर पाटील फरार आहे. या घटनेची मयत ओम देसाई याचा भाऊ आदेश देसाई यांनी कुपवाड पोलीसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ओम देसाई हा कुपवाड एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ओम हा जेवण करून कुटुंबीयांसोबत बसला होता.
यावेळी दहा वाजण्याच्या सुमारास संशयित ओंकार जावीर यांने मयत ओम यास दत्तनगर येथील खुल्या जागेत फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ओंकार यानें देसाई याला तू माझ्या बहिणीच्या मागे का लागला आहेस असा जाब विचारला. यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी जावीर आणि त्याचे मित्र सोहम पाटील, ज्ञानेश्वर पाटील व रोहित केंगार याने चाकू व कोयत्याने ओमच्या पोटात व डोक्यावर सपासप वार केले. या खूनी हल्ल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. यावेळी आरडाओरडा पाहून लगतच रहावयास असलेला त्याचा भाऊ घटनास्थळी दाखल झाला.
त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता त्याच्या भावाने ओम याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ओम याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.