सांगली : नात्यातील मुलीशी विवाह करण्यासाठी तरुणाने रविवारी विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक परिसरात चांगलाच गोंधळ घातला. यावेळी त्याने आक्रमक होत परिसरातील दुकानावरही दगडफेक केली. दोघेही नात्यातीलच असल्याने तरुणीने याबाबत फिर्याद देण्यास नकार दिल्याने रात्री उशिरापर्यंत याची पोलिसात नोंद नव्हती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धिंगाणा घालत दगडफेक करणाऱ्या तरुणाच्या नात्यातीलच तरुणी आहे. ती एका दुकानात कामास आहे. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास तो तरुण आपल्या सहकाऱ्यांसह स्फूर्ती चौकात गेला व त्याने तिला लग्नासाठी विचारले. तिनेही तू सुधारला की, येत्या काही महिन्यांत तुझ्याशी लग्न करते, असे सांगितले. मात्र, तो तरुण ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.
यातून त्याने गाेंधळ घालण्यास सुरुवात केली. याचवेळी त्याने परिसरातील दुकानावरही दगडफेक केली. यावेळी काही नागरिकही तिथे गोळा झाले. नागरिकांनी या प्रकाराची तातडीने विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच पोलीस दाखल झाले. त्यांनी तरुणीला पोलीस ठाण्यात आणत चौकशी केली. यावेळी तरुणीने तरुण नात्यातील असून आम्ही लग्न करणार असल्याचे पाेलिसांना सांगत तरुणाविरोधात कारवाई नको, असे सांगितले. त्यामुळे उशिरापर्यंत गुन्हा दाखल होऊ शकला नाही.
चौकट
पोलिसांची अडचण
संबंधित तरुण तरुणीसमोर धिंगाणा घालत असल्याने त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. मात्र, तरुणीने त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. तिच्या हाताला झालेल्या जखमेबाबतही पोलिसांनी तुला त्या तरुणाने मारहाण केली का, असे विचारले असता, तिने नाही म्हणत स्वत:हूनच जखमा केल्याचेही सांगितल्याने पोलीसही काही करू शकले नाहीत.