सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवून बिसूरच्या तीन तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे याचा भंडाफोड झाला. याप्रकरणी तुषार शिवशरण (रा. डी-मार्टमागे, पोळ मळा, सांगली) याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
बिसूर येथील तीन तरुण महापालिकेत लिपिक, शिपाई या पदावर रुजू होण्यासाठी आले. त्यांच्याकडे आरोग्य विभागात रुजू करून घेण्याची ऑर्डर उपायुक्त राहुल रोकडे यांच्या बोगस सहीने देण्यात आले होती. हे तीन तरुण औषधनिर्माण विभागातील अष्टेकर व गोंजारी यांच्याकडे आले. त्यांनी ऑर्डर दाखविली. अधिकाऱ्यांना त्याबाबत शंका आली. उपायुक्त रोकडे यांची बोगस सही असल्याचे निदर्शनास येताच या तरुणांना घेऊन अष्टेकर व गोंजारी कामगार अधिकारी अनिल चव्हाण यांच्याकडे आले. तिथे पुन्हा शहानिशा करण्यात आली. यावेळी फसवणूक समोर आली.
अधिकाऱ्यांनी तातडीने आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी संपर्क साधला. आयुक्तांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. गेडाम यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना तरुणांची फिर्याद घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार रात्री उशिरा तुषार शिवशरणला अटक केली.
चौकट
तीन वर्षांपासून टोलवाटोलवी
संबंधित तरुण व शिवशरण याची तोंडओळख होती. त्यात शिवशरणने महापालिकेतील निवृत्त अधिकाऱ्याचा भाचा असल्याचे सांगत नोकरीचे आमिष दाखविले. तीन वर्षांपूर्वी त्याने या तरुणांकडून दीड लाखापासून ते पाच लाखापर्यंतची रक्कम घेतली. नंतर त्याने टोलवाटोलवी सुरू केली. तरुण व त्यांचे नातेवाईक दूरध्वनीवरून संपर्क करीत होते. तो अनेकदा टाळाटाळ करीत असे. सोमवारी त्याने तरुणांना नोकरीची ऑर्डर दिली आणि मंगळवारी त्याचा भंडाफोड झाला. त्याने प्रकरण मिटवामिटवीचेही प्रयत्न केले. पण ते सफल झाले नाहीत.
चौकट
अनेकांची फसवणुकीची शक्यता
शिवशरणकडून अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे निरीक्षक प्रशांत निशाणदार यांनी सांगितले.