सांगली : येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नृत्यांगना दीप्ती आहेर यांच्या लावणी शोमध्ये मद्यधुंद टोळक्याने हुल्लडबाजी केली. त्यांनी धिंगाणा घालत रिव्हॉल्व्हर नाचविल्याचे संयोजक मारुती गायकवाड यांनी सांगितले. त्यांना समजावण्याचा व आवरण्याचा प्रयत्न करताना गायकवाड यांनाच धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकाराबाबत पोलिसप्रमुखांना निवेदन देणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नऊ वर्षांंच्या प्रतीक्षेनंतर रविवारी (दि. १३) मंगेशकर नाट्यगृहात लावणी शो झाला. मारुती गायकवाड व सहकाऱ्यांनी नियोजन केले होते. लावणीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक आले होते. कार्यक्रम मध्यंतराला आल्यानंतर एका टोळक्याने गाेंधळ घालायला सुरुवात केली. शिट्ट्या मारणे, आरडाओरड करणे असे प्रकार सुरू झाले. अन्य प्रेक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते शांत झाले नाहीत.शेवटी गायकवाड यांनीच हस्तक्षेप केला. तरुणांना शांत बसून लावणीचा आनंद घेण्याची विनंती केली; पण त्यांनी गायकवाड यांनाच धक्काबुक्की केली. त्यांतील एका तरुणाने रिव्हॉल्व्हर काढून ते नाचविले. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विनंती करूनही त्यांना आवर घालता आला नाही, असे मारुती गायकवाड यांनी सांगितले.दरम्यान, गायकवाड म्हणाले की, नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमावेळी असे प्रकार घडल्यास त्यांना कला सादर करण्यात अडचणी येतील. भविष्यात ते सांगलीत कार्यक्रम देण्यास टाळाटाळ करतील.
सांगलीत मद्यधुंद टोळक्याची हुल्लडबाजी, लावणी कार्यक्रमात नाचवले रिव्हॉल्व्हर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 4:58 PM