सांगली : शहरातील कॉलेज कॉर्नर येथील युनियन बँकेच्या शाखेत पैसे काढल्यानंतर त्या बंडलमध्ये तेलकट नोटा आहेत. त्या नोटा बदलून देतो असे सांगून भामट्याने साडेसात हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिव्या सुरेश म्हारगुडे (रा. संजयनगर) या युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दिव्या म्हारगुडे हिचे युनियन बँकेत खाते आहे. ती बँकेतून २६ हजार रूपये काढण्यासाठी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास गेली होती. बँकेतून कॅशिअरकडून तिला ५०० च्या नोटामध्ये २६ हजाराची रक्कम देण्यात आली. रक्कम बँकेत मोजत असताना ३२ वर्षीय व्यक्ती तिच्या जवळ आला. त्यांने बंडलमध्ये अनेक तेलकट नोटा आहेत. त्या बदलून देतो असे सांगत तिच्याकडून नोटाचा बंडल घेतले.
त्यातील साडेसात हजार रूपये काढून घेऊन तो पळून गेला. दरम्यान ही बाब युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने तात्काळ बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना माहिती दिली. शाखाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक इसम नोटा मोजत असल्याचे दिसून आले. याबाबत दिव्या हिने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे.