मसूर : दुचाकीवरून मसूर येथे सोडण्याच्या तसेच दुचाकीची टाकी चेपविल्याच्या कारणावरून चिडून जाऊन थोरल्या भावाने धाकट्या भावाचा चाकूने भोसकून खून केला. पुनर्वसित चिंंचणी-हेळगाव (ता. कऱ्हाड) येथे बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सागर अंकुश शिराळे (वय २७) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जीवन अंकुश शिराळे (३२) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचणी येथील सागर शिराळे या युवकाला बुधवारी रात्री नजीकच्या एका गावात यात्रेला जायचे होते. त्यासाठी त्याने भाऊ जीवनला ‘मला दुचाकीवरून मसूरमध्ये सोड,’ असे सांगितले. मात्र, जीवनने त्याला नकार दिला. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर सागरने रागाच्या भरात दुचाकीच्या टाकीवर कुकरने घाव घातला. यामध्ये दुचाकीच्या पेट्रोलची टाकी चेपली. जीवनने सागरकडे दुचाकीच्या टाकीची भरपाई मागितली. मात्र, सागरने ‘भरपाई देणार नाही, तुला काय करायचे ते कर,’ असे जीवनला सुनावले. या प्रकारातून चिडून जाऊन जीवनने सागरच्या डाव्या काखेत व पोटाजवळ चाकूने भोकसले. त्यामुळे सागर गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात नजीकच्या गटारामध्ये पडला. घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेऊन गंभीर जखमी असलेल्या सागरला तातडीने कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना सागरचा मृत्यू झाला. याबाबत सागरची पत्नी दीपाली शिराळे हिने मसूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून जीवनवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. भावाभावांत रोजच वादसागर व जीवन यांच्यात नेहमीच वादावादी होत होती. या सततच्या भांडणामुळे परिसरातील कोणीही भांडणे सोडवण्यास जात नव्हते. बुधवारीही मोठमोठ्या आवाजात वाद सुरू असताना कोणीही तिकडे फिरकले नाही. अखेर या वादात सागरचा शेवट झाला. सागरचा विवाह एक वर्षापूर्वीच झाला आहे.
धाकट्या भावाचा भोसकून खून
By admin | Published: April 13, 2017 11:02 PM