लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तासगाव तालुक्यातील सावळज येथे गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. प्रवीण भीमराव साळुंखे (वय ३३, रा. डोंगरसोनी, ता. तासगाव), असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे, असा ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश पाेलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक तासगाव तालुक्यात गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कारवाई केली. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास संशयित प्रवीण साळुंखे सावळज ते अंजनी मार्गावर असलेल्या जयहिंद चौकात थांबला होता. पथकाने त्यास पकडून झडती घेतली असता, त्याच्याजवळ पिस्तूल आढळून आले. ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे असा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. त्याच्यावर आर्म ॲक्टप्रमाणे तासगाव पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप ढेरे, अभिजित सावंत, संदीप गुरव, जितेंद्र जाधव, सतीश आलदर यांच्या पथकाने ही कारवाई केली.