सागाव : काँग्रेसचे नेते, पालकमंत्री पतंगराव कदम यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघ उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिराळा विधानसभा युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय.च्या पदाधिकाऱ्यांनी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस व हातकणंगले लोकसभा युवक काँग्रेस निरीक्षक धुर्वीताई लकडे यांच्याकडे राजीनामे दिले.शिराळा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास राष्ट्रवादीला जाईल, अशी शक्यता सांगली येथे पतंगराव कदम यांनी व्यक्त केली. या वक्तव्याचे पडसाद शिराळा व वाळवा तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमटले असून, युवक काँग्रेसच्या ४६ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.शिराळ्यावर काँग्रेसचा हक्क असतानाही काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस श्रेष्ठींची ही भूमिका निषेधार्ह आहे. १० ते १५ वर्षांपासून शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे काम चालू आहे. २०१० च्या वरिष्ठ काँग्रेस सभासद नोंदणीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक सभासद नोंदणी शिराळ्यात झाली. २०११ मध्ये ११ हजार सभासद नोंदणी केली. २०१३ मध्ये विक्रमी १० हजार सभासद नोंदणी केली आहे. परंतु पक्षातील काही लोकांनी स्वत:चे हित जोपासण्यासाठी पक्षाचे नुकसान होईल, असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आम्ही यापुढील काळामध्ये काम करू इच्छित नाही, असे पत्रात म्हटले आहे.शिराळा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रजित यादव, हातकणंगले लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष जयराज पाटील, विशाल घोलप, राहुल कोरे, राहुल महिंद, गणेश रसाळ, सागर शिरंबेकर, महेश कांबळे, सुवर्णा साळुंखे, रजवाना मुल्ला, महेश कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)
युवक काँग्रेसचे राजीनामास्त्र
By admin | Published: July 21, 2014 11:46 PM