सांगली : पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरवाढीच्या निषेधार्थ सांगली विधानसभा कार्यक्षेत्रातील युवक कॉंग्रेसच्यावतीने गुरुवारी सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणासमोरील पेट्रोलपंपावर गाजर आंदोलन करण्यात आले. वाहनधारकांना गाजर भेट देऊन शासनाच्या दुटप्पी भूमिकेची माहितीही देण्यात आली.यासंदर्भात युवक कॉंग्रेसने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य व केंद्र सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. देशातील सर्व वस्तु व पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर केवळ इंधनाला जीएसटी का लागू केला नाही, हा प्रश्न सामान्याना पडला आहे. यामागे शासनाचे मोठे षडयंत्र आहे. शासनाला इंधनाचे दर कमी व्हावेत, असे वाटत नाही.
त्यामुळेच जीएसटीच्या कक्षेतून इंधन बाजुला केले आहे. आजवर ह्यअच्छे दिनह्णच्या घोषणा करीत सामान्य नागरिकांना वाईट दिवसांचा अनुभव घेण्यास भाग पाडले. सरकार केवळ दिशाभूल करीत असल्याचे त्यांच्या धोरणांवरून स्पष्ट होत आहे.सामान्य नागरिक आज अडचणीत आल्याने तो संतप्त आहे. सरकारच्या कोणत्याही धोरणाचा त्याला फायदा होत नाही. याऊलट सरकारी धोरणांचा प्रतिकुल परिणाम त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे जनतेची ही नाराजी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत.
यापुढेही आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत राहू, असा इशारा देण्यात आला. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यात योगेश राणे, विनायक कोळेकर, सुफिखान पठाण, मयुरेश पेडणेकर, मयुर बांगर, अमित पारेकर, उदय पवार, अरबाज शेख, विनोद पाटील, अमर निंबाळकर आदी सहभागी झाले होते.