लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर वाढवल्याने सांगली शहर व जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने सांगली शहरातील पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढीविरोधात नागरिकांच्या सह्यांचे अभियान राबविले.
कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नागरिकांनीही या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण म्हणाले, मोदी सरकार हे सर्वसामान्य जनतेचे नसून, मोठमोठ्या उद्योगपतींचे सरकार आहे. कोरोना काळात या देशातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी वारंवार पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ हे सरकार करत आहे. जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची दिशाभूल केली. मोदी सरकारने लवकरात लवकर जनतेला परवडतील, असे दर जाहीर करावे, अन्यथा युवक काँग्रेस देशातील जनतेसाठी तीव्र आंदोलन करेल.
युवक काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष सुहेल बलबंड म्हणाले, कोरोनाचे संकट अजूनही आपल्या देशावर कायम आहे. लॉकडाऊनमुळे या देशातील सर्वसामान्य जनतेने आपले रोजगार गमावले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत मोदी सरकारने इंधनाची व घरगुती गॅसची विक्रमी दरवाढ करून या देशातील जनतेची मस्करी केली आहे.
यावेळी आमदार मोहनराव कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील, डॉ. जितेश कदम, प्रभारी जयदीप शिंदे, तौफिक मुलाणी, सौरभ पाटील, संभाजी पाटील, उत्कर्ष खाडे, सनी धोत्रे, योगेश राणे, आशिष चौधरी, आयुब निशाणदार आदी उपस्थित होते.