सांगलीत बेरोजगारीच्या प्रश्नावर युवक कॉंग्रेसचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:07 PM2020-09-17T13:07:13+5:302020-09-17T13:13:31+5:30
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील बेरोजगारी वाढल्याची टीका करीत सांगलीत युवक कॉंग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बेरोजगार दिन साजरा करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला.
सांगली : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील बेरोजगारी वाढल्याची टीका करीत सांगलीत युवक कॉंग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बेरोजगार दिन साजरा करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला.
युवक कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस भवनाजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी मंगेश चव्हाण म्हणाले की, वर्षाला दोन कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले. प्रत्यक्षात या सरकारने बेरोजगारी वाढविली.
नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणाऱ्या कृषी, सूक्ष्म-लघु-मध्यम उदयोग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याची परिणती कुटीर, लघु व मध्यम क्षेत्रातील उद्योगांचे कंबरडे मोडले गेले. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. सरकारच्या भारतीय सांख्यीकी आयोगाच्या अहवालानुसार देशात २0१७-१८ या वर्षात बेरोजगारीचा दर ६.१ टक्के असून ग्रामीण भागातला बेरोजगारीचा दर ५.३ टक्के झाला तर शहरी भागात ७.८ टक्के राहिला.
तरुणामध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक, म्हणजे १३ ते २७ टक्क्यांवर पोहोचला होता. यानंतर कोरोनामुळे काहीही नियोजन न करता लादलेल्या लॉकडाऊनमुळे १२ ते १३ कोटी लोक बेरोजगार झाले असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. तेवढ्याच कुटुंबाचे जगणे रोजगाराविना मुश्किल झाले आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांच्या लहरी व चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा मोदी पूर्णत्वास नेत आहेत. मोदींनी दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात मगेश चव्हाण, संदीप जाधव, सौरभ पाटील, उत्कर्ष खाडे, सनी धोत्रे,अरविंद पाटील, योगेश राणे, सोहेल बलबंड, मयुर पेडणेकर, आशिष चौधरी, शुभम बनसोडे, सलीम मुजवार, ताजुद्दीन शेख. तकलिम मुजावर, अथर्व कराडकर, नायक लाटणे, संग्राम चव्हाण, शफिक शिकलगार, समीर मुजावर, शकलेन मुजावर, श्रीकांत साठे, ओंकार पाटील आदी सहभागी झाले होते.