कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावर धावण्याचा सराव करीत असताना गजानन शंकर दाभोळे (वय १८, सध्या रा. सुपर इंजिनिअरिंग, कुपवाड एमआयडीसी, मूळ गाव हुबळी कर्नाटक) या तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत गजानन दाभोळे या तरुणाचे वडील कुपवाड एमआयडीसीतील सुपर इंजिनिअरिंग या कंपनीत रखवालदार म्हणून काम करीत आहेत. दाभोळे कुटुंब कंपनीतील एका खोलीत राहत आहे. दरम्यान, मयत दाभोळे हा तरुण मंगळवारी सकाळी कुपवाड एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावर धावण्याचा सराव करीत होता. यावेळी तो अचानक रस्त्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुपवाड पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दाभोळे याला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसांना सांगितले आहे.
दरम्यान, मयत गजानन दाभोळे याचे वडील कर्नाटकात गावी गेले होते. तर घरी आई व बहीण दोघीच होत्या. या घटनेची माहिती मिळताच दाभोळे याचे वडील दवाखान्यात दाखल झाले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याने मृत्यूचे कारण समजू शकले नाही. याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.