मिरज : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खुनासाठी गावठी पिस्तूल घेऊन जाणाऱ्या चिक्कोडी (जि. बेळगाव) येथील तरुणास मिरजेत गांधी चौक पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. सचिन बाबासाहेब रायमाने (वय ३४, रा. इंदिरानगर, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे.गांधी चाैक पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना मिरज रेल्वे स्थानकासमोरील हॉटेलजवळ एकजण गावठी पिस्तुलासह थांबल्याची माहिती मिळाली. तत्काळ तेथे पाेहाेचत सचिन रायमानेस पोलिसांनी ताब्यात घेतले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिला ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल घेऊन घरी जात असल्याची कबुली त्याने दिली.बांधकाम कामगार असलेला सचिन पत्नी व दोन मुलांसह चिक्कोडी येथे वास्तव्यास आहे. पत्नीचे इतरांशी अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून सचिनने पत्नीला संपवण्यासाठी कुपवाड येथील एका गुन्हेगाराशी संपर्क साधला. त्याच्याकडून पिस्तूल खरेदी केले. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा डाव उधळला. एका महिलेचा जीव वाचल्याने गांधी चाैक पोलिसांचे कौतुक होत आहे.पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, प्रमोद खाडे, धनंजय चव्हाण, संजय लामदाडे, सतीशकुमार पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Sangli Crime: अनैतिक संबंधाचा संशय, पत्नीच्या खुनासाठी खरेदी केले पिस्तूल; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 11:33 AM