युनूस शेखइस्लामपूर : दूध व्यवसायातील भागीदारीतून उफाळलेल्या आर्थिक वादातून अहिरवाडी येथील २५ वर्षीय युवकाचा लोखंडी गज आणि धारदार हत्याराने तुजारपूर गावच्या हद्दीत खून करण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार काल, गुरुवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास घडला. यातील हल्लेखोर फरारी झाला आहे.सुरज बाळासाहेब सावंत (२५, रा.अहिरवाडी, ता.वाळवा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी कराड येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आली. याबाबत किरण वसंत सावंत यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयीत हल्लेखोर आणि दूध व्यवसायातील भागीदार शरद मच्छिंद्र दुटाळे (रा. अहिरवाडी, ता. वाळवा) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गावातील दूध व्यवसायात दोघांची भागीदारी होती. त्यातील पैशाच्या हिशोबावरून दोघांमध्ये वाद होत होता. व्यवसायातील पैसे मिळावेत यासाठी हल्लेखोर शरद हा नेहमी तगादा लावत असायचा, मात्र सुरज त्याला दाद देत नव्हता. या रागातूनच शरद याने पाळत ठेवून गुरुवारी रात्री सुरज हा तुजारपूर येथील दुध डेअरीमध्ये दूध घालून परत येत असताना तुजारपूर गावातून फाट्याकडे जात असताना वाटेत त्याला अडवले.
यावेळी त्याच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी गजाने व धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. यानंतर सुरज याला उपचारासाठी कराड येथे हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरक्षक जयश्री कांबळे अधिक तपास करत आहेत.