दत्ता पाटील तासगाव : शरद पवारांशी एकनिष्ठ राहिल्यानंतर पक्ष गेला. पक्षाचे चिन्ह गेले. मात्र, या परिस्थितीत देखील आबांचा पट्ट्या ‘कर्तव्य यात्रा’ घेऊन तासगाव, कवठेमंकाळ तालुक्यातील गावागावात लोकांत जात आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते रोहित पाटील कर्तव्य यात्रा घेऊन मतदार संघ पिंजून काढत आहेत. लोकांच्या समस्या जाणून, त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करून, गावातच तळ ठोकून बालेकिल्ला भक्कम करण्याचा प्रयत्न रोहित पाटील यांच्याकडून होत असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादीत फूट पडली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे कुटुंबीय आर. आर. पाटील यांच्या विचारांचा वारसा जोपासत, शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहिले. गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह गेले. काँग्रेसमध्ये खिंडार पडले. महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण होत आहे. मात्र, राज्यात होणाऱ्या या उलथापालथीने विचलित न होता, रोहित पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्याप्रमाणेच जनतेत जाऊन काम करायला सुरुवात केली आहे.दहा दिवसांपूर्वी तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात कर्तव्य यात्रेला सुरुवात केली. या यात्रेच्या माध्यमातून रोज चार गावांचा दौरा करून शेवटच्या गावात मुक्काम करायचा. प्रत्येक गावात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि सामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेत, या समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करताना रोहित पाटील दिसून येत आहेत.
कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून रोहित पाटील यांनी राज्यातील राजकारणाकडे दुर्लक्ष करून, मतदार संघावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. या यात्रेनिमित्त ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचून, बालेकिल्ला भक्कम करण्यासाठी रोहित पाटील यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
बिकट वाट तरीही आव्हान स्वीकारले राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आबा कुटुंबीय गेले असते, तर सत्तेत राहता आले असते. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून खासदारांचा विरोध संपुष्टात आला असता. मात्र, शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळे राजकीय वाटचाल बिकट झाली आहे, तरीही हे आव्हान स्वीकारूनच रोहित पाटील यांची राजकीय वाटचाल सुरू आहे.