सांगली : कोणी अनवाणी पायपीट करीत, कोणी व्रतवैकल्य करीत, तर कुणी अन्य मार्गाने विठ्ठलाप्रती भक्तिभाव प्रकट करीत असतो; पण विठ्ठलाच्या पंढरीची स्वच्छता करीत अनोखा भक्तिभाव व्यक्त करण्याचे काम सांगली, कोल्हापुरातील तरुणांनी केले. आषाढी संपल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवीत अवघ्या चार तासांत पंढरी चकाचक करण्यात आली.
‘स्वच्छता वारी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारी’ असे ब्रीदवाक्य घेऊन सांगलीच्या निर्धार फाउंडेशनने मोहिमेचे नियोजन केले. यात कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते. सांगली व कोल्हापुरातून खासगी बस करून ७० स्वच्छतादूतांची टीम पंढरपुरात द्वादशीला पोहोचली. सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत त्यांनी मोहीम राबविली. एकूण चार तासांची मोहीम राबवून पंढरपूर चकाचक केले.
सांगलीहून पंढरपूरला बस जाताना सांगलीचे पालकमंत्री तथा कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. पंढरीची वारी झाल्यावर तेथील नागरिकांना भेडसावणारा सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे अस्वच्छतेचा. लाखो वारकरी आषाढीला पंढरीत दाखल होतात. आषाढी संपल्यानंतर चंद्रभागेच्या घाटापासून मंदिराच्या आवारापर्यंत अस्वच्छता दिसून येते. शहराची स्वच्छता तितक्याच युद्धपातळीवर होणे गरजेचे असते. यासाठीच गेली अनेक वर्षे स्वच्छतेचा ध्यास घेऊन निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर व टीमने पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरी स्वच्छता अभियान राबवीत आहे.यंदाही मोहीम राबविली. प्लास्टिक कचरा, निर्माल्य एकत्रित गोळा करून पायऱ्यांवर चिकटलेली माती काढण्यात आली. काळवंडलेल्या भिंतीही रंगविण्यात आल्या. त्यामुळे अवघ्या काही तासांत घाट व मंदिर परिसराचे रूपडे बदलले.
या तरुणांनी घेतला सहभाग
या अभियानात भारत जाधव, मारुती देवकर, भरतकुमार पाटील, सतीश कट्टीमणी, मनोज नाटेकर, गणेश चलवादे, संदेश खोत, कृष्णा मडिवाळ, वसंत भोसले, रफिक मोमीन आदींनी सहभाग घेतला.
गतवर्षापेक्षा यंदाच्या स्वच्छता वारीत एक गोष्ट जाणवली की, चंद्रभागेच्या तीरी कचऱ्याचे प्रमाण ५० टक्के कमी होते. ही एक बाब आमच्यासाठी आशावादी आहे. प्रत्येक नागरिक स्वच्छतादूत व्हावा, हे आमचे स्वप्न आहे.- राकेश दड्डणावर, अध्यक्ष, निर्धार फाउंडेशन