सांगली : अतिवृष्टीमुळे डाळिंब बागांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळाली नाही. भाजीपाल्याला दर नसल्यामुळे तो शेतात सडत आहे. अन्य पिकांप्रमाणे भाजीपाल्यासही हमीभाव मिळाला पाहिजे, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या पोरांनीच आवाज उठविला आहे. मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत उपोषण सुुरू केले आहे.
ऋषिकेशन साळुंखे, विजय कोरे, रवींद्र म्हमाणे, नंदकुमार कोळी, बापू कोळी, सचिन कांबळे, बळवंत लोखंडे, आनंदराव पांढरे, चंद्रकांत बंडगर, श्रीकांत माळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे. आंदोलकांनी अतिवृष्टीमुळे आटपाडी तालुक्यातील डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तरीही विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्याची भरपाई देत नाहीत. शासन त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादन घेतले आहे, पण त्यास दर नसल्यामुळे शेतात भाजीपाला सडत आहे. या शेतकऱ्यांना शासनाने भरपाई दिली पाहिजे, तसेच गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही भरपाईही शासनाकडून अद्याप मिळाली नाही. शेतकरी रात्रंदिवस राबत असूनही त्यांना न्याय मिळत नाही. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी कोणत्याही संघटनेची मदत न घेता, अमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्याचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या तरुण शेतकऱ्यांच्या आंदोलनास सांगलीतील अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
चौकट
दुधात भेसळ करून शेतकऱ्यांना बदनाम नको : ऋषिकेश साळुंखे
शेतकरी प्रामाणिक स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे दूध डेअरीमध्ये घालत आहेत. डेअरी चालक स्वत: भेसळ करून दूध संघांना घालत आहे. या भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दुधातील भेसळ थांबविली पाहिजे, पण अधिकाऱ्यांकडून योग्य कारवाई होत नसल्यामुळे भेसळीचे प्रकार चालूच आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची होणारी बदनामी थांबवावी, अशी मागणीही ऋषिकेश साळुंखे यांनी केली आहे.