सांगली : मिरज शहरातील एका उपनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दत्ता लक्ष्मण ढवारे (वय ३०, मूळ ढोकी जि. उस्मानाबाद, सध्या रा. कोल्हापूर चाळ, मिरज) असे आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे आरती देशपांडे- साटविलकर यांनी काम पाहिले.खटल्याची माहिती अशी की, आरोपी ढवारे याने पीडितेच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले होते. यातून पीडिता गरोदर राहिली होती. याबाबत पीडितेच्या आईने विश्वासात घेऊन तिला विचारले असता, पीडितेने आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले होते. त्यानंतर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी सुनीता साळुंखे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.तपासादरम्यान पीडितेचा कायदेशीररीत्या गर्भपात करून, डीएनएचे सॅम्पल घेण्यात आले. सरकारपक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेचा जबाब, पीडितेच्या आईचा जबाब, वैद्यकीय पुराव्याचा विचार करण्यात आला. त्यानुसार आरोपीस शिक्षा सुनावण्यात आली. पैरवी कक्षातील रमा डांगे, वंदना मिसाळ, शरद राडे, गणेश वाघ, अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले.
मिरजेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणास दहा वर्षांची शिक्षा
By शरद जाधव | Published: September 07, 2022 7:03 PM