सांगली : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी यशवंतसिंह राजाराम मरकाम (वय २०, सध्या रा. वाॅनलेसवाडी, ता. मिरज, जि. सांगली, मूळ रा. दादनकापा, लुर्मी, जि. बिलासपूर, छत्तीसगढ) याला पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कैद सुनावण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी हा निकाल दिला.भारतीय दंड विधन कलम ३६३ नुसार मरकाम याला दोषी ठरविण्यात आले. दंडाची ५,००० रुपयांची रक्कम पिडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. याकामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील माधव कुलकर्णी यांनी काम पाहिले.या प्रकरणी पिडित अल्पवयीन मुलीच्या आईने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली होती. यशवंतसिंह याने ११ मार्च २०१९ रोजी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेले. तिला पुणे येथे नेऊन ठेवले. रेल्वेतून छत्तीसगढ येथे घेऊन जाताना दौंड स्थानकावर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस उपनिरीक्षक एस. सी. पाटील यांनी याचा तपास केला. मुलीच्या आई-वडिलांचा, लोहमार्ग पोलिस दत्तात्रय खोत यांचा जबाब नोंदविला.या खटल्यात पोलिस निरिक्षक संजय मोरे, कर्मचारी सनी मोहिते, आय. एम. महालकरी, शरद राडे, सुनीता आवळे यांनी मदत केली.
साक्षीदार ठरला महत्वाचासाक्षीदार आकाश परदेशी याने न्यायालयास सांगितले की, तो रेल्वेने प्रवास करत असताना दौंडजवळ त्याच्या डब्यामध्ये आरोपी व पिडिता आले. त्यावेळी आरोपीची वर्तणूक संशयास्पद आढळून आल्याने त्याने तेथील रेल्वे पोलिसांना कळवले. पोलिसांनी यशवंतसिंहकडे चौकशी केली असता, त्याने मुलीस पळवून घेऊन आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.