कोकरुड : शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे एका सर्व्हिस सेंटरसमोर उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव मोटारीने धडक देत दुचाकीवरील तरुणास चाळीस फूट फरफटत नेले. अपघातात रतन भास्कर हा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना काल, शुक्रवारी घडली. याबाबत कोकरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड-शेडगेवाडी राज्य मार्गावर एका सर्व्हिस सेंटरसमोर कराडच्या दिशेने दुचाकी (एमएच ०९ एफसी ७३५५) उभी होती. या दुचाकी शेजारी योगेश सखाराम कांबळे आणि रतन भास्कर कांबळे (दोघे रा. मालेवाडी, ता. शाहुवाडी) उभे होते. दरम्यान कराडहून शेडगेवाडीकडे भरधाव वेगात आलेल्या मोटार चालक लक्ष्मण विठ्ठल कांबळे यांचा मोटारीवरील (एमएच १४ ईसी १७३७) ताबा सुटला. यावेळी मोटारीची विरुद्ध दिशेला दुचाकीला जोराची धडक झाली. धडक इतकी जोराची होती की, दुचाकी शेजारी उभे असलेले दोघे तरुण ४० फूट फरफटत गेले. अन् मोटार विजेच्या खांबाला धडकली. अपघातात रतन भास्कर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद योगेश कांबळे यांनी कोकरुड पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी चालक लक्ष्मण कांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Sangli: रस्त्याकडेला उभे होते, भरधाव मोटारीने फरफटत नेले; युवक गंभीर जखमी
By अविनाश कोळी | Published: November 11, 2023 6:38 PM