लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊनचा मार्ग अवलंबला आहे. या पार्श्वभूमीवर ‘एकच टास्क, वापरा मास्क’ या उपक्रमाचा अवलंब प्रभावीपणे करावा लागेल. तरुणाईने स्वतः मास्क वापरला पाहिजे. त्याबरोबरच इतरांचेही प्रबोधन करावे, असे मत प्रा. संजय ठिगळे यांनी व्यक्त केले.
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. ठिगळे यांनी ‘लढा कोरोनामुक्तीचा’ हा उपक्रम राबविला असून, या उपक्रमांतर्गत त्यांनी ‘एकच टास्क, वापरा मास्क’ ही मोहीम राबविली आहे. या मोहिमेंतर्गत ते सायकलवरून फिरताना लोकांना मास्क वापरण्याविषयी व सामाजिक अंतर राखण्याविषयी प्रबोधन करतात.
ते म्हणाले की, गावे व शहरे कोरोनामुक्त करण्यासाठी तरुणाईने अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. ऑनलाइन पद्धतीचा वापर करून प्रबोधन करण्याची गरज आहे. सार्वजनिक हिताचा विचार करून दक्षता घेतली पाहिजे.