सांगली : कॉलेज जीवन हे सर्वात आनंददायी असते. स्वातंत्र्यलढ्यातही तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने स्वातंत्र्य मिळाले होते. आजची तरूणाई मात्र, अभ्यास, वाचनालयांऐवजी डीजेच्या तालावर रमत आहे. तरूणाई सैराट झाल्याने सोशल मीडियाला अधिक वेळ देत आहे. त्यामुळेच आता तरूणांनी बदलत ग्रामविकास व कृषी विकासाचा झेंडा हाती घ्यावा, असे आवाहन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी सोमवारी सांगलीत केले.
विलिंग्डन महाविद्यालय शताब्दी व्याख्यानमालेत ‘लोकसहभागातून ग्रामविकास’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील होते.पवार पुढे म्हणाले की, वाढते शहरीकरण व अधिक उत्पादनाच्या नावाखाली शेतीवर होत असलेले अघोरी उपाय पाहता, आजारांचे प्रमाण वाढत आहे. जमिनी खराब करून टाकल्या आहेत. यासाठी आता तरूणांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावातील प्रत्येक थेंबाचे नियोजन केले, तर दुष्काळाशीही दोनहात करता येऊ शकतात. आजच्या तरूणांच्या हातात माहिती तंत्रज्ञानाचे मोठे जाळे आले आहे. याचा चुकीचा परिणामही दिसून येत आहे.
मैदाने ओस पडली असून मुलांच्या हातात फेसबुक आणि व्हॉटस् अप दिसत आहे. त्यामुळेच सुटीच्या काळातील मामाचा गाव, शेतामधील भटकंती बंद झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कोचिंग क्लासचे फॅड वाढले आहे. सिनिअर कॉलेजमध्ये बसायला विद्यार्थी नाहीत आणि कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही, असे चित्र आहे. तरूण मुलेही मानसिक तणावात अडकली आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास, ज्या घरातील मुले निरोगी, ते घर समाजातील सर्वात श्रीमंत घर ठरणार आहे. सैराट होणे म्हणजे एखाद्या विषयावर जिवापाड प्रेम करणे होय. पण आजचे तरूण वेगळ्याच कारणासाठी सैराट होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.यावेळी प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर, डॉ. बिराज खोलकुंबे, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना पाण्याचा ताळेबंद शिकवापवार म्हणाले की, पावसाचे पाणी अडविण्याचा आणि ते जिरविण्याचा उपक्रम सर्वांनी राबविला पाहिजे. पाण्याचा ताळेबंद कुणीही मांडत नाही. हिवरे बाजारने हा ताळेबंद मांडल्याने डरडोई उत्पन्नात वाढ झाली. आता विलिंग्डन महाविद्यालयानेही शताब्दीनिमित्त नवीन उपक्रम राबविताना पाण्याच्या ताळेबंदाचा विषय सुरू करावा. पर्यावरण विषयावरही भर दिल्यास विद्यार्थ्यांनाही वास्तवाची जाणीव होण्यास चांगली मदत होणार आहे.