मिरज : खंडेराजुरी ता. मिरज येथे रविवारी रात्री लग्नाच्या वरातीत सुमित जयंत कांबळे (वय २१) या तरुणाचा सुरज सचिन आठवले व साथीदारानी चाकूने भोसकून खून केला. रंगपंचमीदिवशी रंग लावण्याच्या वादातून व पूर्व वैमनस्यातून सुरज आठवले व साथीदारानी सुमित कांबळे यास लग्नाच्या वरातीत नाचताना पोटात व छातीवर चाकूचे सपासप वार करून ठार मारले. सुरज आठवले हा गुन्हेगारी वृत्तीचा असून यापूर्वी त्याने गणेशोत्सवात खंडेराजुरीत एका तरुणावर चाकूहल्ला केला होता. खिद्रापूर येथील आठवले याचे खंडेराजुरी आजोळ असून गावात त्याने दहशत निर्माण केली होती. गावातील सुमित कांबळे याच्याशी रंगपंचमीला रंग लावण्याच्या वादातून सूरजचा वाद झाला होता. या वादातून सूरजने सुमित यास बघून घेण्याची धमकी दिली होती.रविवारी रात्री गावात सुमित धनसरे यांच्या लग्नाच्या वरातीत सुमित कांबळे हा डीजेवर नाचत होता. यावेळी सूरज व त्याच्या साथीदारांनी रंग पंचमीला झालेल्या वादाचा जाब विचारत सुमित यास घेरले. सूरज याने सुमित यांच्या छातीवर पोटावर चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सुमित तेथेच खाली पडला. डीजेच्या आवाजात सुमित याच्यावर चाकूहल्ला झाल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही. थोड्या वेळाने सुमित गर्दीत खाली पडल्याचे दिसल्यानंतर वरातीत धावपळ उडाली. यावेळी सूरज व साथीदार तेथेच नाचत होते. सूरज याचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सुरज आठवले याच्यासह अतुल वायदंडे, शरद ढोबळे, आकाश कांबळे या साथीदारांना ताब्यात घेतले. अन्य दोघेजण फरार झाले.
मृत सुमित कांबळे हा लष्करात भरतीची तयारी करत होता. भरतीची परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. काही दिवसात तो वैद्यकीय तपासणीसाठी जाणार होता. सुमित यांच्या खुनामुळे गावात खळबळ उडाली. सुरज आठवले याच्याविरुद्ध यापूर्वी खुनी हल्ला , चोऱ्या, दादागिरी असे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात सुरज आठवले व त्याच्या साथीदाराविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.