सांगली : विश्रामबाग परिसरातील एका महाविद्यालयात तरुणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला. एका तरुणाचा तलवार घेऊन पाठलाग करण्यात आला. शनिवारी दुपारी ही घटना घडली. झाडाझुडपाचा आधार घेत हा तरुण पळून गेल्याने बचावला. या घटनेची विश्रामबाग पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती. दोन दिवसांपूर्वी कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात तरुणांच्या दोन गटात मारामारी झाली होती. आकाश वडर यास भरदिवसा चाकूने भोसकले होते. ही घटना ताजी असतानाच, शनिवारी पुन्हा विश्रामबाग येथील एका महाविद्यालयात तरुणांच्या टोळक्यांनी दहशत माजविली. दोघांच्या हातात तलवारी होत्या. तलवारीसह एका तरुणाचा ते पाठलाग करीत होते. महाविद्यालयाच्या आवारात हा थरारक प्रकार सुरु होता. जोरजोराने ओरडत टोळक्याकडून पाठलाग सुरु होता. त्यांना घाबरुन विद्यार्थी व विद्यार्थिनींची पळापळ झाली. महाविद्यालयातील झाडाझुडपांचा आधार घेत हा तरुण पळून गेल्याने बचावला. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी महाविद्यालयात भेट देऊन पाहणी केली. पण प्रशासनाने आम्हाला काहीच माहिती नाही, असे सांगितले. त्यामुळे याची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. तसेच ज्या तरुणाचा पाठलाग झाला, तोही तक्रार देण्यासाठी आला नव्हता. (प्रतिनिधी)
महाविद्यालयात तरुणांचा धुमाकूळ
By admin | Published: August 28, 2016 12:18 AM