सांगली : विजयनगर येथील जिल्हा न्यायालय इमारत आवारातील तीन धार्मिक स्थळांचे अतिक्रमण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी पहाटे पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटविले. त्यानंतर दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास एमआयएमचा कार्यकर्ता इम्रान जमादार (वय ३१, रा. गणेशनगर) याने छऱ्याची बंदूक घेऊन अतिक्रमणस्थळी आत्महत्येचा इशारा दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गेल्यावर्षी शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणांची यादी तयार केली होती. यामध्ये विजयनगर येथे नव्याने झालेल्या न्यायालयाच्या इमारत परिसरातील तीन धार्मिक स्थळांचाही समावेश होता. या धार्मिक स्थळांमुळे न्यायालयाच्या संरक्षक भिंतीला अडचण होत होती. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात न्यायालयाने महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाला सूचनाही दिल्या होत्या. वकिलांच्यावतीनेही तशी मागणी करण्यात आली होती.
परंतु धार्मिक प्रश्न असल्याने प्रशासनाकडून तात्काळ कारवाई झाली नव्हती. याबाबत पुन्हा विचारणा झाल्याने आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासनाने याबाबत एकत्रित बैठक घेतली. त्यानुसार आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी मिरज उपायुक्त स्मृती पाटील, अतिक्रमण विभागाचे प्रमुख डी. टी. घोरपडे, तसेच सहायक संचालक नगररचना यांना प्राधिकृत केले. या धार्मिक स्थळांचे कोणतेही अधिकृत ट्रस्ट नाहीत. तरीदेखील तेथे पूजाअर्चा होत होती. याप्रकरणी संंबंधितांना लेखी नोटीसही देण्यात आली. त्यानुसार संबंधित व्यक्तींना विश्वासात घेऊन सोमवारी पहाटे ही धार्मिक स्थळे पथकाने हटविली.
अतिक्रमण हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दिवसभर येथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. दरम्यान, दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास एमआयएमचा कार्यकर्ता इम्रान जमादार घटनास्थळी आला. संरक्षक भिंतीवरून उडी मारून तो अतिक्रमण काढलेल्या जागी गेला. तिथे त्याने खिशातून छºयाची बंदूक काढत, अतिक्रमण का काढले? असा प्रश्न विचारला. त्याच्या हातात बंदूक पाहून साºयांचीच पळापळ सुरू झाली. न्यायालयात आलेले पक्षकार, बंदोबस्तासाठी असलेले पोलीस घटनास्थळाकडे धावले. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, विश्रामबागचे निरीक्षक अनिल तनपुरे हेही फौजफाट्यासह दाखल झाले. जमादार याने पोलिसांनाही जवळ येण्यास मज्जाव केला. जवळ आला तर आत्महत्या करू, असा इशाराही त्याने दिला. अर्धा तास हे नाट्य सुरू होते.अखेर पोलीस व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जमादार याची समजूत काढली. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन मुख्यालयात आणले. उपायुक्त स्मृती पाटील यांनीही पोलीस मुख्यालयात जाऊन त्याची समजूत काढली. आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सायंकाळी त्याच्यावर दाखल करण्यात आल्याचे विश्रामबागचे निरीक्षक तनपुरे यांनी सांगितले.बंदोबस्तात कार्यवाहीसोमवारी पहाटे अतिक्रमणे काढून संबंधित नागरिकांच्या ताब्यात तेथील मूर्तीसह अन्य साहित्य देण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस, महापालिका प्रशासनाने सर्व खबरदारी घेऊन अतिक्रमणे हटविण्याबाबतची सर्व कार्यवाही पूर्ण केली.सांगलीत सोमवारी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील अतिक्रमणे हटविल्याने एमआयएमच्या कार्यकर्त्याने बंदूक हाती घेऊन आत्महत्येचा इशारा दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.