सांगली : कर्नाळ रस्त्यावरील हाॅटेल रणवीरमध्ये बुधवारी रात्री साडेदहाच्यासुमारास अकराजणांनी धिंगाणा घातला. यावेळी हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच एका कर्मचाऱ्याचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी व्यवस्थापक विकी दत्ता बदामकर (वय २६) याने सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी केतन नलवडे याच्यासह अनोळखी अकराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कर्नाळ रोडवरील हाॅटेल रणवीरमध्ये केतन नलवडे व अनोळखी अकराजण आले होते. रात्री साडेदहाच्यासुमारास किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर नलवडे व त्याच्या साथीदारांनी हाॅटेलमधील गुरुराज, राजेश व रवींद्र शेट्टी या तीन कामगारांना शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात ते जखमी झाले, तर कुक नंदादीप चव्हाण याचा मोबाईलही लंपास केला. हाॅटेलमधील साहित्य, टेबल, खुर्च्यांची मोडतोड केली, तसेच पार्किंगमधील दुचाकीचे दहा हजार रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.