'वंचित'मुळे युती, आघाडी चिंतीत; बदलणार पाच मतदारसंघांचं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 12:11 PM2019-07-03T12:11:52+5:302019-07-03T12:17:57+5:30

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेतल्याने विधानसभा निवडणुकीतही त्यांचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीसमोर उभे राहणार आहे.

Yuti & Aghadi Concerns due to Vanchit bahujan Aghadi in Sangali | 'वंचित'मुळे युती, आघाडी चिंतीत; बदलणार पाच मतदारसंघांचं गणित

'वंचित'मुळे युती, आघाडी चिंतीत; बदलणार पाच मतदारसंघांचं गणित

- श्रीनिवास नागे 

सांगली - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेतल्याने विधानसभा निवडणुकीतही त्यांचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीसमोर उभे राहणार आहे. त्यातून जिल्ह्यातील आठपैकी चार ते पाच मतदारसंघांतील समीकरणे बदलणार आहेत.

सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांवर मते घेतली. त्यामुळे येथील सहा विधानसभा मतदारसंघांत आघाडी आणि युतीला या नव्या विरोधकाची धास्ती वाटू लागली आहे. सांगलीत भाजपचे आ. सुधीर गाडगीळ पुन्हा मैदानात असतील. जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी डोंगरे यांना ‘वंचित’तर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आघाडीकडून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई मदन पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मिरज राखीव मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांना भाजपने कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. काँग्रेसने ‘वंचित’शी आघाडी केल्यास ही जागा ‘वंचित’ला वा ‘स्वाभिमानी’साठी सोडली जाईल. अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुकांतीलच नाव ‘वंचित’ किंवा ‘स्वाभिमानी’कडून पुढे येऊ शकते.

विशाल पाटील व आ. विश्वजित कदम यांची भूमिका सांगली तसेच मिरजेतील काँग्रेसचा उमेदवार निवडण्यात निर्णायक ठरणार आहे.
जतमध्ये भाजपचे आ. विलासराव जगताप यांना पक्षांतर्गत विरोध वाढत असून, दुसऱ्या गटाकडून डॉ. रवींद्र आरळी, तम्मणगौडा रवी-पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. काँग्रेसचे विक्रम सावंत पुन्हा तयारीत आहेत. लोकसभेला ‘वंचित’ने येथे दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यामुळे माजी आमदार प्रकाश शेंडगे, अशोक बन्नेनवार या इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील व अजितराव घोरपडे यांची लढत निश्चित दिसते. खा. संजयकाका पाटील यांचे हे ‘होम ग्राऊंड’ असून, त्यांची ताकद कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. धनगर समाजामुळे येथेही ‘वंचित फॅक्टर’ चालणार आहे.

खानापुरात शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी भाजप व खासदार गटाशी जुळवून घेतले आहे. पण भाजपमध्ये असलेले माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. काँग्रेसकडून माजी आमदार सदाशिवराव पाटील तयारीत आहेत. गोपीचंद पडळकर यांचे ‘होम पिच’ असून ते स्वत: लढणार की, कोणाला पाठिंबा देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसकडून आ. विश्वजित कदम व भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यातील सामना वर्षभरापूर्वीच ठरला आहे. शिराळ्यात भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांना तगडी लढत देण्यासाठी राष्टÑवादीच्या मानसिंगराव नाईक यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मात्र काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना कसे थांबवणार, हा प्रश्न आघाडीसमोर आहे. तेथे सम्राट महाडिक यांनी आधीच उमेदवारी जाहीर करून युतीसमोर पेच निर्माण केला आहे.

जयंत पाटील यांना शह देणार?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी भाजपने चाल रचण्यास सुरुवात केली आहे. आ. पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा चंग महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधला आहे. निशिकांत पाटील, राहुल महाडिक, आनंदराव पवार, गौरव नायकवडी येथून इच्छुक आहेत.

२०१४ मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय : इस्लामपूर : जयंत पाटील (राष्ट्रवादी) १,१३,०४५. प्रतिस्पर्धी उमेदवार : अभिजित पाटील (अपक्ष) ३७,८५९. फरक : ७५१८६
सर्वांत कमी मतांनी विजय : शिराळा : शिवाजीराव नाईक (भाजप) ८५,३६३. प्रतिस्पर्धी उमेदवार : मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी) ८१,६९५. फरक : ३६६८

एकूण जागा : ८ 
 सध्याचे बलाबल
भाजपा - ४, शिवसेना - १, राष्ट्रवादी - २, काँग्रेस - १

Web Title: Yuti & Aghadi Concerns due to Vanchit bahujan Aghadi in Sangali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.