सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला मुख्य संशयित व बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यास सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून पुण्यातील येरवडा कारागृहात हलविण्यात आले आहे. दरम्यान, १२ मार्चला कोथळे खून-खटल्याची सुनावणी आहे. यादिवशी विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार आहेत.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे व त्याचा मित्र अमोल भंडारे यांना लूटमारीच्या गुन्ह्यात अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला कोठडीत बेदम मारहाण केली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे महादेवगडच्या जंगलात नेऊन जाळला होता. याप्रकरणी कामटेसह सात संशयितांना अटक केली होती. यातील कामटेचा मामेसासरा बाबासाहेब कांबळे याच्याविरुद्ध ठोस पुरावे न मिळाल्याने त्याला या गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव कामटेसह हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांना सांगली कारागृहात न ठेवता कोल्हापुरातील कळंबा कारागृहात ठेवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात कारागृह प्रशासनाने केवळ कामटेलाच येरवडा कारागृहात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याला एकट्यालाच येरवड्याला हलविले आहे.सुनावणी लांबणीवरअनिकेत कोथळे खून-खटल्याची मंगळवारी सुनावणी होती. यासाठी केवळ युवराज कामटेलाच न्यायालयात आणण्यात आले होते. पण या खटल्याचे काम पाहणारे विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित न राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. १२ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. यादिवशी आरोप निश्चितीबाबत काम चालणार आहे.