अशोक पाटीलइस्लामपूर : जिल्हा परिषदेच्या संभाव्य प्रभाग रचनेत वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट फोडण्यात आले आहेत. काही ठिकाणी मातब्बर विरोधकांना संपविण्याचा डाव यातून समोर आला आहे. जिल्हा परिषदेचे येलूर व कामेरी गट संपुष्टात आले आहेत. यातून विरोधकांकडील हे दोन परंपरागत मतदारसंघ ताब्यात घेण्याची खेळी असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या विरोधकांतून होत आहे.
वाळवा तालुक्यातील पेठ, कामेरी, येलूर जिल्हा परिषद मतदारसंघांवर भाजपमधील महाडिक गटाचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांचे वर्चस्व आहे. कामेरी गटात भाजपच्याच सी. बी. पाटील यांचे पुत्र जयराज पाटील यांनी तयारी केली आहे. आता पेठ मतदारसंघात कामेरीचा समावेश करून कामेरी मतदारसंघ रद्द केला आहे. कामेरीत राष्ट्रवादीचे, तर पेठवर महाडिकांचे वर्चस्व आहे. कामेरी हे मोठे गाव पेठ मतदारसंघात समावेश करून महाडिक गटाला अडचणीत आणण्याचा डाव खेळण्यात आल्याचे दिसून येत आहे.दुसरीकडे येलूर गट रद्द करून महाडिक गटाचा प्रभाव असलेले येलूर गाव चिकुर्डेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. चिकुर्डेत राष्ट्रवादीच्या विरोधातील शिवसेनेचे नेते अभिजित पाटील यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीच्या विरोधातील दोन नेत्यांच्या गटात संघर्षाची ठिणगी टाकून कुरळप मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुरक्षित केल्याचे बोलले जाते.
वाळवा तालुक्यातील उर्वरित रेठरेहरणाक्ष, बोरगाव, नेर्ले, कासेगाव, वाटेगाव, पेठ, वाळवा, बावची, कुरळप मतदारसंघांत किरकोळ फेरबदल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीविरोधी गटांना शह देण्यासाठी असे फेरबदल केल्याचा आरोप केला जात आहे.ग्रामस्थांतून संतापजिल्हा परिषद मतदारसंघांच्या यादीतून कामेरी, येलूर ही नावे प्रथमच पुसली जाणार आहेत. ही गावे दुसऱ्या मतदारसंघांत समाविष्ट केल्याने या गावांतील ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.
आमच्या हक्काच्या मतदारसंघात कितीही बदल केले, तरी काहीही फरक पडणार नाही. पूर्वीपेक्षा जास्त मतांनी आमचे उमेदवार निवडून येतील. -राहुल महाडिक, संचालक, जिल्हा बँक, सम्राट महाडिक, सदस्य, प्रदेश भाजप
विरोधकांना गारद करण्यासाठी पद्धतशीरपणे जिल्हा परिषद मतदारसंघांची रचना केली आहे. तरीही आम्ही ताकदीने निवडणूक लढवू. इतिहासात पहिल्यांदाच अशी फेररचना झाली आहे. कामेरी आणि पेठ ही मोठी गावे तसेच येलूर आणि चिकुर्डे ही गावे एकत्र केली आहेत. - जयराज पाटील, प्रदेश सचिव, भाजयुमो