सांगली : जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा बुधवारपासून (दि. १७) सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसे लेखी आदेश शिक्षण विभागाने मंगळवारी काढले.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शिक्षक संघाने सकाळच्या सत्राची मागणी केली होती. शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, पाचवीपासूनचे सर्व वर्ग सुरू असून शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थितीही भरपूर आहे. त्यांना वाडी-वस्तीवरून चालत शाळेत यावे लागते. त्यांच्या आरोग्याचा विचार करता शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याची गरज आहे. शिक्षण समिती बैठकीमध्ये तसा ठराव करावा.
यासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण सभापती आशाताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, ॲड. शांता कनुजे यांची भेट घेतली. जिल्हाध्यक्ष अमोल माने, सरचिटणीस राहुल पाटणे आदींनी सभापतींशी चर्चा केली. शेजारच्या जिल्ह्यांत शाळा सकाळी भरविण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. त्यानुसार सभापती पाटील यांनी लवकरच तसे आदेश काढण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार मंगळवारी आदेश काढण्यात आला. आता बुधवारपासून सकाळी ७.३० ते दुपारी १२ या वेळेत शाळा भरतील.