मिरज पंचायत समितीची मासिक सभा सभापती गीतांजली कणसे यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेत कचरा डेपो व कत्तलखान्याचा विषय चर्चेला आला. कचरा डेपो व कत्तलखान्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा डेपो व कत्तलखाना वड्डी ग्रामपंचायत हद्दीत आहे. तो चालविण्यासाठी जिल्हा परिषदेचा परवाना आवश्यक आहे. तो घेतलेला नाही. उशिराने जाग आलेला जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दंडात्मक कारवाईच्या पुढे जाण्यास तयार नाही. बेकायदा कचरा डेपो व कत्तलखाना वड्डी ग्रामपंचायतीने दिलेला परवाना रद्द करून सील करावा, अशी मागणी किरण बंडगर यांनी केली. याप्रश्नी आरोग्य विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू. त्याबरोबर कचरा डेपो व कत्तलखान्यावर कारवाई करण्यात हयगय झाल्यास जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन करू, असा इशारा उपसभापती अनिल आमटवणे, विक्रम पाटील व किरण बंडगर यांनी दिला.
शहरातील मोकाट कुत्री महापालिका कवलापूर विमानतळाच्या जागेत सोडत असल्याच्या तक्रारीकडे विक्रम पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तासगाव-म्हैसाळ रस्त्यावरील निकृष्ट खड्डे भरणीप्रकरणी किरण बंडगर यांनी अधिकाऱ्यास धारेवर धरले. खड्डे भरून पुन्हा खड्डे पडत असतील तर त्या खड्ड्यात वृक्षारोपण करण्यासाठी रोपे द्या, अशी संतप्त मागणी दिलीपकुमार पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे केली. सभेत रंगराव जाधव, सतीश कोरे यांच्यासह सदस्यांनीही प्रश्न उपस्थित केले.
चौकट
पदाधिकारी-अधिकाऱ्यांचे अभिनंदन
ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल उपसभापती अनिल आमटवणे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार डी. एस. कुंभार व गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या अभिनंदनाचा ठराव किरण बंडगर यांनी मांडला. पंचायत समितीच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दलही बंडगर यांनी उपसभापती आमटवणे व गटविकास अधिकारी सरगर यांचे कौतुक केले.