लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषद स्वीय निधी समान वाटपाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व पक्षीय ४५ सदस्यांनी पदाधिकाऱ्यांविरोधात बंड केले आहे. बुधवारी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी बैठक बोलवूनही त्याच गैरहजर राहिल्यामुळे सदस्यांनी त्यांच्या दालनात चार तास ठिय्या मारला. दोन दिवसांत निधी वाटपाचा तोडगा निघाला नाही तर सोमवारी अध्यक्षांच्या दालनासह जिल्हा परिषदेला टाळे ठोकण्याचा इशारा सदस्यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेत अध्यक्षा कोरे यांच्या दालनात बुधवारी राष्ट्रवादीचे सदस्य शरद लाड, अर्जुन पाटील, संजीव पाटील, संजय पाटील, नितीन नवले, भगवान वाघमारे, काँग्रेसचे महादेव दुधाळ, विशाल चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडमुठे यांच्यासह ४५ सदस्यांची समान निधी वाटपाची मागणी आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, चार सभापतींनीच स्वीय निधी आपसात वाटप करुन विकास कामाच्या फायली फिरविल्या होत्या. याबाबतची माहिती सदस्यांना मिळाल्यानंतर त्यांनी समान निधी वाटपासाठी आवाज उठविला आहे.
निधी वाटपावरून सदस्य आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत सर्व पक्षीय सदस्यांची बैठक दुपारी १२ वाजता बोलविली होती. परंतु, अध्यक्षा कोरे यांनी आजारी असल्यामुळे बैठकीला येऊ शकत नाही, असा निरोप दिला. यामुळे सदस्य आणखी संतप्त झाले. तसेच जोपर्यंत अध्यक्षा येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू, असा सदस्यांनी इशारा दिला. त्यानुसार सायंकाळी साडेपाचपर्यंत सदस्यांनी ठिय्या मारला होता. अखेर भाजपचे गट नेते तम्मनगौडा रवी-पाटील यांनी अध्यक्षा कोरे यांच्या दालनात येऊन सदस्यांची समजूत काढली. पण, सदस्यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. सर्व पक्षीय सदस्यांनी तीन दिवसांत निधी वाटपात तोडगा निघाला नाही, तर सोमवारी अध्यक्षांच्या दालनासह जिल्हा परिषदेला टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करू, असा इशारा दिला.
चौकट
आजारी असल्यामुळे बैठकीस गैरहजर
अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी सांगितले की, आजारी असल्यामुळे जिल्हा परिषदेतील बैठकीस हजर राहता आले नाही. पण, सदस्यांना योग्य निधीचे वाटप करण्यात येईल. कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. पुन्हा बैठक घेऊन निधी वाटपाचा प्रश्न सोडविण्यात येईल.