त्या म्हणाल्या की, गावाच्या विकासाला प्राधान्य देत निवडणुका बिनविरोध होणे गरजेचे आहे. विकासाचे नवीन मॉडेल गावागावात तयार करण्यासाठी नवीन योजनादेखील राबविता येतील. त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन विकास करावा आणि गावासाठी निधी घेऊन जावा. गावातील ज्येष्ठ, प्रतिष्ठित, जाणकार व्यक्तींनी एकत्र यावे. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला त्यात हस्तक्षेप करू देऊ नये. त्यातून आपापसातले वाद, संघर्ष टाळून विकासाभिमुख निवडणुका होतील याकडे लक्ष द्यावे. पराभव झाला तर तो जिव्हारी लावून विकासकामात खोडा न घालता गावाच्या विकासाला प्राधान्य द्यायला हवे. विकास करणाऱ्या गावांना निधी देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. गाव, वाड्यावस्त्यांवरील निवडणुकीत पक्ष बघू नये. गावपातळीवर निर्णय घ्यावा. स्थानिकांच्या इच्छाशक्तीतून गावाचा कायापालट करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद पंधरावा वित्त आयोग, जनसुविधा, स्वीय निधीतून ग्रामपंचायतीला १५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेला डिजिटल करणे, ग्रामपंचायतीला संगणक उपलब्ध करून देण्यासह पथदीप किंवा हायमास्ट बसविण्यासाठी या निधीचा उपयोग करता येऊ शकतो. अथवा गावातील अन्य विकासकामासाठीही निधीचा वापर केला तर काहीच हरकत नाही, असेही प्राजक्ता कोरे म्हणाल्या.
चौकट
गावातील एकजूट जपा
काहीजण ग्रामपंचायतीच्या निवडणुकींना अस्तित्वाची निवडणूक असाही रंग देतात. ते करू नये. आम्ही विकासकामांची स्पर्धा करतोय. त्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी व्हावे. गावातील एकोपा, एकजूट जपत लोकसहभागातून ग्रामविकासासाठी बिनविरोध निवडणुका होणे गरजेचे आहे, गावातील सूज्ञ नागरिक व युवकांनी बिनविरोध निवडणुकीसाठी नक्की प्रयत्न करावा, असे आवाहनही प्राजक्ता काेरे यांनी केले.