राष्ट्रवादीची मंडळी सारखी कॅलेंडर अन् घड्याळाकडं बघताहेत. ‘साहेब’ २५ तारखेला येणार आहेत म्हणे. प्रश्न अमाप आहेत अन् त्यांची उत्तरं साहेबांकडंच आहेत! त्यांच्याशी बोलावं तर ते अमेरिकेत. इथली वेळ तिथल्या वेळेपेक्षा साडेनऊ तासांनी पुढं. साहेब दुपारनंतर फोनवर येतात, त्यावेळी इकडं रात्र चढायला लागलेली असते. इथले कार्यकर्ते बोलण्याच्या मनस्थितीत नसतात. (दिवसभराच्या पक्ष बैठका, लोकांची कामं, मोर्चे, आंदोलनांनी थकून गेलेले असतात बिचारे! बजाज कंपनीला विचारा हवं तर!) कथित लॉटरी घोटाळा प्रकरणानं सगळा महाराष्ट्र ढवळून निघालाय. त्यावर साहेबांनी ‘व्हॉटस् अॅप’वरून उत्तर दिलं, पण ते सविस्तर बोलणार आहेत, तिकडून आल्यावरच. त्या आनंद कुलकर्र्णींचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करू का, असं राहुल पवार, कमलाकर, रंगरेज वगैरेंनी विचारलं म्हणे! पण सांगलीतल्या दीनानाथ नाट्यगृहामधल्या ‘कार्यक्रमा’ची याद ताजी असल्यानं साहेबांनी डोळ्यांनीच दटावल्याचं व्हीडीओ कॉन्फरन्स बघणाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणात कृष्णप्रकाश यांनीही मोका साधला. त्यांची ‘जानी दुश्मनी’ मिरज दंगलीपासूनची. यावर बाकीचं कुणीच बोलू नका, असं साहेबांनी बजावलंय म्हणे! बहुदा या प्रकरणात अभ्यासांती, साक्षेपानं पण सावधपणे बोलणारा, सडेतोड अन् चपखल उत्तरं देणारा कुणीच नजरेसमोर आला नसावा. किंवा अशा ‘अर्थ’पूर्ण, राज्यव्यापी विषयावर दुसरं कोणी बोलून आणखी घोळ व्हायला नको, अशी भीती असावी. (नाहीतरी सहज बोलता-बोलता भल्याभल्यांची गाडी कशी घसरते, याचा अनुभव राष्ट्रवादीला नवा नाही!) साहेबांच्या हुकुमामुळं हल्ली ‘लॉटरी’ हा शब्द उच्चारायलाही राष्ट्रवादीच्या गोटात बंदी आहे म्हणे. काल तर कहरच झाला, महापालिकेत आपल्याला सभापतीपदाची ‘लॉटरी’ लागली, आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची ‘लॉटरी’ कुणाला लागणार, असं ताजुद्दीनभैय्यांनी कुंडलच्या शरदभाऊंना विचारताच सगळ्यांचे डोळे विस्फारले. त्यावर आष्ट्याच्या शिंदे साहेबांनी कानात काहीतरी सांगितलं अन् ताजुद्दीनभैय्यांनी जीभ चावली.या प्रकरणात संभाजीआप्पा पवारांच्या पैलवान पोरांनीही हात धुऊन घेतलाय. इस्लामपूर पालिकेतल्या ई-टेंडरपासून जत कारखाना विकत घेण्यापर्यंतच्या ‘भानगडी’ (हा संभाजीआप्पांचा शब्द, बरं का!) त्यांनी खुल्या केल्या. त्यावर मात्र साहेबांचे निष्ठावान पुढं सरसावले. आप्पांच्या पोरांसारख्या ‘चिल्लर माणसां’च्या (हे पी. आर. पाटील दादांचं म्हणणं हं!) आरोपांना उत्तरं देण्यासाठी दररोज एकेकाची तजवीज केलीय. प्रत्येकानं संबंधित विषयांवरील आरोपांवर बोलायचं. (कुणी काय बोलायचं, हे साहेब स्वत: त्यांच्याकडून पाठ करून घेतात म्हणे. हे सगळं व्हीडीओ कॉन्फरन्सवरून चालतं!!)----------------------------तिकडं काँग्रेसच्या मंडळींनाही त्यांच्या साहेबांची प्रतीक्षा होती. ते ‘साहेब’ बुधवारी आले. राष्ट्रवादीच्या साहेबांनी परदेशी जाण्याआधीच सगळ्या तालुक्यांत झंझावाती दौरे करून जिल्हा परिषद अन् पंचायत समित्यांसाठी चाचपणी केली. ते परत काही ‘गडबड’ करण्यापूर्वी काँग्रेसनंही मेळाव्यांचा धडाका लावला. पहिल्या टप्प्याची धुरा मोहनशेठ कदमांवर दिली. ‘साहेब’ मात्र काल आले. साहेबांच्या ‘होमपीच’वर पलूसमध्ये मेळावा झाला. पण नेमक्या त्याच मेळाव्यातून प्रतीकदादा अन् शैलजाभाभी रूसून निघून गेल्या. कारण काय तर साहेबांच्या माणसांनी मेळावा ‘हायजॅक’ केला. सगळीकडं साहेबांच्या गटाचेच फोटो! अगदी स्टेजवरसुद्धा!! सोनियाजी, राहुलजींची छबी कुठंच नाही. प्रतीकदादा माजी केंद्रीय राज्यमंत्री असूनही त्यांचा फोटो सोडा, पण नावही स्टेजमागच्या बोर्डावर नव्हतं. (अर्थात हे साहेबांना बिलकूल माहीत नव्हतं बरं का! प्रतीकदादा अन् शैलजाभाभी निघून गेल्यावरच साहेबांचं लक्ष तिकडं गेलं म्हणे! नंतर साहेबांनी याचं खापर तालुका कमिटीवर फोडलं.) मग काँग्रेसशी निष्ठावान असलेल्या प्रतीकदादांना राग येणार नाही तर काय? आधीच साहेबांच्या लोकांनी पद्धतशीर सगळी सूत्रं हातात घ्यायचं अभियान चालवलंय. त्यात पुढच्या लोकसभेला थेट साहेबच मैदानात उतरणार असल्याची कुजबूज काहींनी मुद्दाम सुरू केलीय. महापालिकेत मदनभाऊंच्या जुन्या गटाशी विशालदादांच्या गटानं पंगा घेतलाय. तिथं साहेब काय करणार आहेत, याचा थांगपत्ता लागत नाही. विशालदादा आगामी विधानसभेला उतरायची तयारी करताहेत. त्यांचं बस्तान बसायला लागलंय. या सगळ्यामुळं आपले कार्यकर्ते ‘सैराट’ सुटलेत. त्यात हे अनुल्लेखानं मारणं बरं दिसतं का? या विचारांनी प्रतीकदादा अस्वस्थ झालेत.----------------------------जाता-जाता : काँग्रेस-राष्ट्रवादीनं जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली असताना भाजपमध्ये मात्र शांतता आहे. पुढाकार कुणी घ्यायचा, श्रेय कुणी घ्यायचं, नेता कुणी व्हायचं... निवडणुकीत एकटं लढायचं की कुणाशी हातमिळवणी करायची, ताकद दाखवायची की राष्ट्रवादीच्या साहेबांशी समेट करायचा... या सवालांचे जबाब शोधण्यात जो-तो शक्ती खर्ची टाकतोय. एका मुद्द्यावर मात्र त्यांचं एकमत होतंय, की ‘आपण सारे पांगुळगाड्यावरचे प्रवासी आहोत!’----------------------------ताजा कलम : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात अजित गुलाबचंद आणि भाजपची मंडळी यांच्यातला संघर्ष टोकाला गेलाय. ताब्यावरून भांडणं सुरू झालीत. अजित गुलाबचंद हे बारामतीकर साहेबांचे निकटवर्तीय. असं असतानाही त्यांच्या संचालकांना हटवून भाजपच्या मंडळींनी स्वत:चा संचालक तिथं बसवला. या सगळ्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबाच पुढं आहेत. यावर बारामतीकर साहेब अजून गप्प कसे, असं विचारलं जात असतानाच गुरुवारी भाजपचेच खासदार संजयकाका पाटील आणि भाजपचेच नेते दीपकबाबा शिंदे यांनी पृथ्वीराजबाबांच्या संचालकाला बाहेर काढून अजित गुलाबचंद यांचा संचालक पुन्हा ‘गादीवर’ बसवला! आहे की नाही बारामतीकरांची किमया? दिली ना भाजपमध्येच लावून..? बसा म्हणावं आता मारामाऱ्या करत... झिंग... झिंग... झिंगाट!!(ही पोस्ट ‘व्हॉटस् अॅप’वरून फिरतेय हं.)श्रीनिवास नागे-सांगली
झिंग... झिंग... झिंगाट
By admin | Published: June 23, 2016 11:23 PM