सांगली : जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बारा सदस्य शिवसेना, भाजपच्या प्रचारात सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई करायची?, असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर उपस्थित झाला आहे़ पंचायत समिती सदस्यांनीही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश धुडकावून शिवसेना व भाजप उमेदवारांच्या प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे़राष्ट्रवादीमधील खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख या नेत्यांनी भाजपमध्ये, तर अनिल बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला़ या नेत्यांच्या समर्थक नऊ जिल्हा परिषद सदस्यांनी आणि पंचायत समितीच्या बावीस सदस्यांनी शिवसेना व भाजप उमेदवाराच्या प्रचारात आघाडी घेतली आहे़ खानापूर तालुक्यातील चारपैकी किसन जानकर, फिरोज शेख हे दोन जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीमधील आठपैकी सात सदस्य अनिल बाबरसमर्थक असून एक सदस्य काँग्रेसचा आहे. हे सर्व सदस्य राष्ट्रवादीचे असले तरीही, शिवसेनेचे उमेदवार बाबर यांच्या प्रचाराची धुरा ते सांभाळत आहेत़ राष्ट्रवादीचे आटपाडी तालुक्याचे नेते तानाजी पाटील यांनी तर शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे़ त्यांच्या पत्नी मनीषा पाटील जिल्हा परिषदेत सभापती आहेत़ तानाजी पाटील यांच्यावर कारवाईची नोटीस दिली आहे़ पण, त्यांच्यावर पुढे कोणती कारवाई होणार, याकडे आटपाडी तालुक्यातील जनतेचे लक्ष आहे़ अजितराव घोरपडे तासगाव-कवठेमहांकाळमधून भाजपकडून उमेदवार आहेत़ त्यांचे समर्थक जिल्हा परिषद सदस्य तानाजी यमगर भाजपचा प्रचार करीत आहेत़ कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख आहेत़ त्यांच्या प्रचारात सदस्या सुवर्णा पिंगळे सक्रिय आहेत़ राष्ट्रवादीचे एकेकाळचे नेते आणि सध्याचे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या समर्थक जिल्हा परिषद सदस्या शुभांगी पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतच भाजपचा प्रचार केला होता. सध्याही त्या भाजपच्या उमेदवाराचा तासगावमध्ये प्रचार करीत आहेत़जिल्हा परिषद सदस्यांबरोबरच भाजप आणि शिवसेनेत गेलेल्या राष्ट्रवादी नेत्यांचे समर्थक बावीस सदस्य आहेत़ या सदस्यांनीही नेत्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे़ तरीही राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मात्र त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू शकत नाहीत़, याबद्दल राष्ट्रवादी उमेदवारांमधून तीव्र नाराजी आहे़ उमेदवारांची नाराजी असली तरीही जिल्हा परिषदेतील सत्ता टिकविण्यासाठी फुटीर नऊ सदस्यांची राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना गरज आहे़ (प्रतिनिधी)तालुकाध्यक्षांच्या सूचनेनंतर कारवाई राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुक्याचे नेते तानाजी पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे़ याप्रकरणी त्यांना नोटीस बजावली असून दि़ १० पर्यंत खुलासा मागविला आहे. त्यानंतर त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार आहे़ त्यांची पत्नी शिवसेनेचा प्रचार करीत असल्याबद्दल तक्रार नसल्याने त्यांच्यावर कारवाई केली नाही़ राष्ट्रवादीचे अन्य नऊ सदस्य भाजप आणि शिवसेनेचा प्रचार करीत असतील, तर त्यांच्याविरोधात तेथील संबंधित राष्ट्रवादी उमेदवार आणि तालुकाध्यक्षांनी तक्रार केल्यास सर्व सदस्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिला आहे़डोंगरे यांच्यावर कारवाई करणार : कदमशिवाजी डोंगरे हे काँग्रेसच्या चिन्हावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत़ तरीही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून सध्या ते सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत़ याप्रकरणी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांकडून अहवाल मागविला असून त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई करणार आहे, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी दिला आहे़ काँग्रेसच्या सर्व जि़ प़ आणि पंचायत समिती सदस्यांनी पक्षाच्या उमेदवाराचाच प्रचार करावा, अन्यथा त्यांच्यावरही पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले़
झेडपी सदस्य शिवसेना, भाजपच्या प्रचारात
By admin | Published: October 07, 2014 10:55 PM