सांगली : जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतीपदांची निवडणूक मंगळवार, दि. ३० रोजी होणार आहे. ही निवडणूक लढविणार नसल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चारही पदांवर राष्ट्रवादी सदस्यांची वर्णी लागणार असून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत नाराज झालेल्या सदस्यांना संधी मिळणार आहे. आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, वाळवा तालुक्यांना पदे मिळणार असून, नेत्यांच्या गुप्त बैठकीत नावेही निश्चित झाली आहेत.सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या अध्यक्षपदावर वर्णी लावण्यासाठी मनीषा पाटील, तासगावमधून कल्पना सावंत, योजना शिंदे, स्नेहल पाटील यांचे प्रयत्न सुरू होते़ मागील निवडीवेळी तानाजी पाटील यांना पुढीलवेळी संधी देण्याचे आश्वासन दिले होते़ त्यामुळे पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील यांचीच वर्णी लागणार, अशी चर्चा होती़ परंतु, अचानक माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचे गणित मांडून जत तालुक्यातील रेश्माक्का होर्तीकर यांना संधी दिली़ त्यामुळे विलासराव जगतापविरोधी गटाला बळ मिळाले़ परंतु, मनीषा पाटील, सावंत, योजना शिंदे या सदस्यांच्या मनात नेत्यांविरोधात असंतोष आहे़ याचा उद्रेक विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून आर. आर. पाटील, माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ यातूनच मनीषा पाटील यांना बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपद देऊन नाराजी दूर करण्यात येईल. आटपाडी तालुक्यातील उज्वला लांडगे, कुसूम मोटे यापैकी एका सदस्यास सभापतीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. असे झाले तर अन्य सभापतींच्या समित्यात बदल होईल. तासगाव तालुक्यातून सावळजच्या कल्पना सावंत, मणेराजुरी गटातील योजना शिंदे यांच्यापैकी एकीला महिला व बालकल्याण समिती सभापती पदाची संधी मिळणार आहे़ लिंबाजी पाटील यांच्यारूपाने वाळवा तालुक्याला उपाध्यक्षपद दिले असले तरी, पाटील यांचा परिसर शिराळा विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे विधानसभेची गणिते बांधून वाळवा तालुक्याला आणखी एक सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे़ पपाली कचरे आणि मीना मलगुंडे यांच्या नावांची चर्चा आहे़ परंतु, मीना मलगुंडे यांचाही गट शिराळा विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे पपाली कचरे यांचे समाजकल्याण सभापतीपदी नाव निश्चित झाल्याचे समजते. कोठावळे यांना कृषी सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
झेडपी सभापती निवडी बिनविरोध
By admin | Published: September 30, 2014 12:15 AM