सातारा : एकाच जागेवर वेगवेगळ्या बॅंकेचे तारण कर्ज घेऊन स्टेट बॅंकेची १ कोटी १५ लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून फलटण येथील आयुर उद्योग समुहाचे प्रमुख दिगंबर आगवणेंसह पाच जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.दिंगबर रोहिदास आगवणे, जयश्री दिंगबर आगवणे, रोहिदास नामदेव आगवणे, सत्यवान धर्मराज आगवणे, भिमराव गुलाबराव माने (सर्व रा.गिरवी, ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिगंबर आगवणे यांनी पिंपळवाडी, ता. फलटण येथील ४० गुंठेंची जागा सेंट्रेल बॅक ऑफ इंडिया, कॅनरा बॅंक व बॅंक आॅफ इंडिया या बॅंकांना तारण दिली होती. त्यावर त्यांनी १४२ कोटी १३ लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र, असे असताना आगवणेंसह पाचजणांनी ही बाब साताऱ्यातील गोडोली शाखेच्या स्टेट बॅंके पासून लपवून ठेवून बॅंकेकडून त्याच जागेवर १ कोटी १५ लाख रुपयांचे तारणकर्ज घेऊन बॅंकेचा विश्वासघात केला.याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर संदीप राव कांबळे (वय ४२, रा. पिरवाडी, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत.
बँकेची १ कोटीची फसवणूक; आयुर उद्योग समुहाचे प्रमुख दिगंबर आगवणेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 2:52 PM