सातारा : जिल्ह्यामध्ये आज, शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १ हजार ६५२ लोक कोरोना बाधित आढळून आले आहेत. रुग्ण वाढीचा दर ३२.३७ टक्के इतका वाढला आहे.प्रशासनाच्या वतीने गुरुवारी ५ हजार १०४ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातून दीड हजारांच्या वर रुग्ण आढळले आहेत. सातत्याने होणारी रुग्ण वाढ ही सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. प्रशासनाच्यावतीने निर्बंध लागू केले असून देखील रुग्ण वाढ सातत्याने होत आहे. त्यामुळे या निर्बंधांचा उपयोग काहीच होत नाही काय? असा सवाल देखील लोक विचारू लागले आहेत.जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या यात्रा रद्द करण्यात आल्या, शाळा, खासगी क्लासेस तसेच महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली आहेत. तरी देखील सातत्याने रुग्ण वाढ होतच आहे. विवाह सोहळ्यासाठी अवघ्या पन्नास लोकांची उपस्थिती बंधनकारक केले आहे. अंत्यसंस्काराला देखील सगळेच्या सगळे नातेवाईक जाऊ शकत नाहीत. जिल्हा प्रशासन निर्बंध लादले ते गुणवाढ रोखली गिरी नसल्याने हे प्रशासनाचे अपयश आहे, असा आरोप देखील होत आहे.दुसऱ्या बाजूला सातत्याने रुग्ण वाढ सुरूच असली तरी जिल्ह्यामध्ये टक्क्यांच्यावर रुग्ण हे घरात राहूनच बरे होत असल्याचे चित्र आहे. व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजनची गरज असणारे रुग्ण अत्यल्प आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत योग्य तो निर्णय प्रशासनाच्या पातळीवर घेणे गरजेचे असल्याचे मत सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
चिंताजनक! जिल्ह्यात १ हजार ६५२ जण कोरोना बाधित; रुग्ण वाढीचा दर बत्तीस टक्क्यांच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 2:29 PM