सातारा: मायणी, ता. खटाव येथील अभयारण्य परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलिसांनी संयुक्त कारवाई करून पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख ५५ हजार रुपयांचा १० किलो २२४ ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई दि. ६ रोजी दुपारी करण्यात आली. जाकीर गुलाब मुजावर (वय ४१, रा. सांगोला जिल्हा सोलापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली पथक तयार केले. या पथकाला जिल्ह्यातील अंमली पदार्थ गांजाची विक्री, वाहतूक लागवड करणाऱ्या व्यक्तिंची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पथक माहिती काढत असताना एक व्यक्ती मायणी मधील अभयारण्य परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे पथकाला समजले. त्यानंतर एलसीबीचे पथक आणि वडूज पोलिसांनी तेथे जाऊन सापळा लावला. त्यावेळी जाकीर मुजावर हा गांजाची पिशवी घेऊन येताना पोलिसांना दिसला. त्याच्या पिशवीची पोलिसांनी झडती घेतली असता पिशवीमध्ये १० किलो २२४ ग्रॅम गांजा आढळून आला. त्याच्यावर वडूज पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषध द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार अतीश घाडगे, मोहन नाचण, संजय शिर्के, विजय कांबळे, अमित सपकाळ, गणेश कापरे, प्रवीण पवार आदींनी या कारवाईत भाग घेतला.गांजाला सोन्याचा भाव...अंमली पदार्थ विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही अनेकजण झटपट पैसे मिळण्याच्या हव्यासाने गांजा हा अंमली पदार्थ विक्री करत असतात. स्थानिक गुन्हे शाखेने अशा प्रकारे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धडक मोहीम राबविली आहे. सहा महिन्यांत आतापर्यंत एक कोटीहून अधिक रकमेचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. कोणी उसाच्या शेतात गांजाची लागवड केली होती तर कोणी इमारतीच्या टेरेसवर. पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती काढून गांजाची लागवड उद्ध्वस्त केली.
Satara: मायणी येथे अडीच लाखांचा दहा किलो गांजा पकडला, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:55 AM