लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : बँकांच्या खासगीकरणाविरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज फेडरेशनने पुकारलेल्या ‘बंद’ला सातारा जिल्हयात प्रतिसाद मिळाला. सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोेरे जावे लागले. तसेच जिल्ह्यात १०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.
आयडीबीआय आणि दोन खासगी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात सरकारने केलेल्या घोषणेच्या विरोधात बँक कर्मचारी सोमवार व मंगळवार असे दोन दिवस संपावर गेल्याने कामकाज ठप्प राहिले. चेक क्लिअरिंग हाऊसेस बंद राहिल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. सातारा जिल्हयातील एकवीसशे कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचे एम्प्लॉईज फोरमच्यावतीने सांगण्यात आले. मंगळवारी या कर्मचाऱ्यांनी बँकांसमोर एकत्रित येत खासगीकरणाविरोधात निषेधाच्या घोषणा केल्या.
यासंदर्भात बँक अधिकारी मोतिराम निकम म्हणाले, की राष्ट्रीयीकृत बँका या शासनाच्या सर्व योजना चालवतात. मात्र खासगीकरण झाल्यास जनतेलाच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे सरकारने बँकांचे खासगीकरण थांबवावे, अशी आमची मागणी आहे.
दरम्यान, या संपामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया आदी संघटना सहभागी होत आहेत.