वाई : वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात वाईतील सेवाभावी संस्थेने ‘आपले पाणी आपल्या रानी’ या संकल्पनेचा ध्यास घेऊन ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चे काम हाती घेतले आहे. घाटात नैसर्गिक स्त्रोत असणाऱ्या ठिकाणी सीसीटी बंधारे तयार करून पाणी अडवून राहण्यासाठीचे नियोजन केले आहे. सेवाभावी संस्थेने जवळ-जवळ शंभर सीसीटी बंधारे व दीडशे झाडांचे वृक्षारोपणासाठी खड्डे तयार केले आहेत. त्यामध्ये पावसाळ्यात पाणी साठल्यास दर वर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे.
वाई भागात पावसाचे प्रमाण इतर तालुक्यांच्या मानाने चांगले असते. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण कसे राहणार? हे काही दिवसांतच समजणार आहे, हवामान खात्याने धोक्याची घंटा वाजविल्याने त्या मानाने पाऊस कमी पडल्यास पाण्याचे दुर्भिक्ष या भागातही जाणवण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन पाणी संचय व वृक्षारोपण करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. पसरणी घाटात मार्च, एप्रिलमध्येच पाणी टंचाई जाणवल्याने संपूर्ण घाटात याच काही संस्थांच्या माध्यमातून पक्ष्यांना व सरपटणाºया प्राण्यांसाठी पाण्याची भांडी बांधण्यात आली आहेत. त्याचे अनुकरण इतरही तालुक्यांतील घाटांमध्ये करण्यात आले आहे.
संपूर्ण चार महिन्यांत पाणी मिळाल्याने पक्ष्यांचा तसेच प्राण्यांचा मृत्यू झाला नाही, हेच या संस्थेचे मोठे यश आहे.पाणी टंचाईवर उपाय म्हणून वाईतील सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. हे बंधारे कृषी विभागाकडून बांधणे अपेक्षित असताना या विभागाकडून असे कोणतेही नियोजन होताना दिसत नाही.पाचशे झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प प्रशांत डोंगरे, महेश खरात यांच्या सेवाभावी संस्थेने केला. यावर्षी १०० सीसीटी बंधारे व १५० झाडांचे वृक्षारोपण करण्यासाठी नियोजन केले. यामध्ये शंभर पिंपळ, १०० आवळा, १०० बहावा तर इतरही काही औषधी झाडांचे वृक्षारोपण करण्यात येऊन त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करण्याचा संकल्प केला आहे.पसरणी घाटामध्ये तरुणांकडून समतल चर काढले जात आहेत.