सातारा : अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी रस्त्यावर गतिरोधक हवे असतात. पण; साताऱ्यात मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंतरात तब्बल आठ ठिकाणी गतिररोधक तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्रास टाळण्यासाठी वाहनधारकांनी अशा रस्त्याऐवजी दुसऱ्या रस्त्याचा वापर सुरू केला आहे.सुरक्षित प्रवासासाठी गतिरोधक असणे महत्वाचे असते. त्यासाठी संबंधित विभाग धोकादायक ठिकाणे ठरवून गतिरोधक तयार करते. जिल्हा, राज्य मार्गावर गतिरोधक आवश्यक असतात. तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणीही गतिरोधकाची गरज असते. पण, किती अंतरात किती गतिरोधक असावेत यालाही काही नियम असणे गरजेचे आहे.साताऱ्यांत मात्र, वेगळी परिस्थिती आहे. येथील मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंंतरात तब्बल आठ गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. अवघे ४०-५० फूट गेले की आला गतिरोधक अशी स्थिती आहे. त्यामुळे वाहनधारकांना गिअर बदलण्यातच वेळ खर्च करावा लागत आहे.
त्यातच गतिरोधकावरुन वाहन नेताना होणारी धडधड तर आजारांना निमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक या रस्त्यावरून जाणे टाळतात. खऱ्या अर्थाने या रस्त्यावर दोन-तीन ठिकाणीच गतिरोधक असणे आवश्यक ठरणार आहे.