सातारा : जिल्ह्यात मान्सुनोत्तर पाऊस सुरूच असून, कोयना पाणलोट क्षेत्रातही हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने साठा १०५ टीएमसीवर पोहोचला. परिणामी, शुक्रवारी पहाटेच धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने उचलून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे कोयनेतून सध्या १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.जिल्ह्यात मागीलवर्षी अपुरे पर्जन्यमान झाले. त्यामुळे पश्चिम भागातील धरणेही भरली नव्हती. तसेच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. जून महिना उजाडेपर्यंत टंचाईचा सामना करावा लागला. पण यावर्षी जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा राहिलेली आहे. त्यातच यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनचा पाऊस दाखल झाला. जून महिन्यातही समाधानकारक हजेरी लावली. यामुळे पश्चिम भागातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी, कोयना आदी प्रमुख धरणांत पाणीसाठा वाढू लागला आहे. तर जुलै महिन्यात पावसाचा अधिक जोर होता. त्यामुळे तळाला असलेली धरणे भरू लागली. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही दमदार पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत. त्यातच सध्याही जिल्ह्यात पाऊस पडत आहे.पश्चिम भागातील कोयना धरण, कांदाटी खोरे, महाबळेश्वर भागात पाऊस सुरू आहे. यामुळे प्रमुख धरणात संथ गतीने पाण्याची आवक होत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी पायथा वीज गृहाचे एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.त्यानंतरही पाऊस झाल्याने धरणातील पाणीपातळी १०५.३ टीएमसीपर्यंत पोहोचली. धरण ९९ टक्क्यांवर भरल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी पहाटेच धरणाचे सर्व सहा दरवाजे एक फुटाने उचलून ९ हजार ५४६ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास धरणातून एकूण १० हजार ५९६ क्युसेक विसर्ग सुरू झाला. परिणामी, कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर २४ तासांत कोयनेला १३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
Satara: पाऊस पुन्हा बरसला! कोयनेतून १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू
By नितीन काळेल | Published: October 18, 2024 7:30 PM