दहिवडी : माण बाजार समितीच्या निवडणुकासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसअखेर एकूण १८ जागांसाठी १०२ अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया बाबर यांनी दिली. विशेष म्हणजे या निवडणुकीत आमदार जयकुमार गोरे, माजी सनदी अधिकारी, प्रभाकर देशमुख, शेखर गोरे, अनिल देसाई यांनी वेगवेगळे अर्ज दाखल केले.
सोसायटी मतदारसंघ निवडणुकांतील ११ जागांसाठी ६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील सर्वसाधारण गटासाठी ७ जागांसाठी - ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महिला प्रवर्गाच्या २ जागांसाठी - ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी ६ अर्ज दाखल झाले आहेत. विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी एक जागा असून ६ अर्ज दाखल झाले आहेत.
ग्रामपंचायत मतदारसंघातून चार उमेदवार निवडून द्यावयाचे असून त्यासाठी २५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी सर्वसाधारण मतदारसंघातील दोन जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. आर्थिक दुर्बल घटकतून एका जागेसाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. व्यापारी मतदारसंघातून दोन जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हमाल मापाडी मतदारसंघातून एका जागेसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. असे एकूण आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर उद्या १३ जुलैला अर्ज छाननी होणार आहे तर २८ जुलैपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.