म्हसवड : दुष्काळी माण तालुक्यातील पन्नास पैशांपेक्षा कमी आनेवारी आलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. दहिवडी महाविद्यालयाकडून परीक्षा फी घेण्याचे बंद झाले असल्याने विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत करून पेढेवाटप करत आनंद साजरा केला.शासन निर्णयानुसार राज्यातील टंचाईग्रस्त तालुक्यातील पन्नास पैशांपेक्षा कमी आनेवारी असलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तरीही अनेक शालेय-महाविद्यालयातून परीक्षा फी आकारली जात होती. याविरोधात माण तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत सोनबा विरकर विद्यापीठ प्रशासनाविरोधात आमदार शशिकांत शिंदे व सर्व पदाधिकारी तसेच सातारा जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सहकार्याने लढा उभारून जिल्हाधिकारी यांना भेटून त्यांनाही निवेदन देण्यात आले होते.त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी परीक्षा शुल्क माफ केले असून कोणीही घेऊ नये, याचे परिपत्रक दिल्यानंतर ते परिपत्रक महाविद्यालयाला दाखवून विद्यापीठाशी संपर्क साधला असता त्यांनी मान्य करून सर्व शालेय-महाविद्यालयांना परीक्षा फी माफ असल्याने कोणीही घेऊ नये, असे सांगितले. त्यानंतर परीक्षा फी न घेता अर्ज भरून घेतले. विरकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून, परीक्षा शुल्क माफ झाल्याने विद्यार्थ्यांनी दहिवडी महाविद्यालयात पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
१०६ गावच्या तरुणांना परीक्षा शुल्क माफ
By admin | Published: February 11, 2016 9:57 PM