मायणी : पाचवड (ता. खटाव) येथील ह.भ.प. माणिक महाराज घाडगे यांनी एक वर्ष अखंड श्रमदान करून येथील डोंगर उतारावर तब्बल १०७३ सीसीटी बंधारे तयार केले आहेत. हे बंधारे तयार केल्यामुळे संपूर्ण डोंगररांगा पाणीदार होण्यास मदत होणार आहे.
पाचवड (ता. खटाव) येथील डोंगर उतारावर २०१९मध्ये पाणी फाउंडेशन अंतर्गत पाणलोटाची कामे पूर्ण झाली होती. याच कामादरम्यान २०२०च्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे दोन माती बांध फुटले व शेकडो लिटर पाणी वाया गेले. ही खंत मनात घेऊन ह.भ.प. माणिक महाराज यांनी हे दोन बंधारे दुरुस्त केले. शिवाय वर्षभरामध्ये याठिकाणी दोन मीटर लांब व दोन फूट सरासरी खोलीचे सीसीटी बंधारे बांधण्याचा संकल्प केला. त्याचदरम्यान येणाऱ्या त्यांच्या १३ मे २०२० च्या वाढदिनी त्यांनी एक हजार सीसीटी बंधारे बांधण्याचा संकल्प केला व केलेल्या संकल्पाच्या निश्चितीसाठी रोज अखंड येथील डोंगर उतारावर जाऊन त्यांनी सीसीटी बंधारे तयार करण्याचे काम सुरू केले. काहीवेळा गावातील युवकांकडून व समवयस्कर व्यक्तींकडूनही सहकार्य मिळाले. वर्षात अखंड श्रमदान करून १००० सीसीटी बंधाऱ्याचा संकल्प पूर्ण केलाच, शिवाय आजअखेर हे १०७३व्या सीसीटीचेही पूजन केले. त्यांनी वर्षभर केलेल्या श्रमदानामुळे आज संपूर्ण डोंगर उतारावर हजार व सीसीटी बंधारे उभे राहिले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात हा डोंगर उतार पाणीदार होण्यास नक्कीच मदत होणार आहे. शिवाय या बंधाऱ्यात मुरले जाणाऱ्या पाण्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
कोट...
गतवर्षी १००० सीसीटी बंधारे तयार करण्याचा संकल्प केला होता. संपूर्ण वर्षभर लाॅकडाऊन तरीही श्रमदान करून हा संकल्प पूर्ण केला. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी गावातील युवक व समवयस्कर व्यक्तींची मदत झाली. शिवाय उन्हाळी पावसाने या बंधाऱ्यात पाणी साठल्याने समाधान वाटले.
-ह.भ.प. माणिक महाराज, सामाजिक कार्यकर्ते, पाचवड
चौकट
श्रमदानामुळे यावर्षी टँकर नाही...
प्रत्येकवर्षी पाचवड गावात पिण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करावी लागते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पाणी फाउंडेशन व श्रमदानातून मोठ्या प्रमाणातील कामांमध्ये पाणीसाठा झाला व हजारो लिटर पाणी जमिनीत मुरल्यामुळे गावातील संपूर्ण विहिरी व कूपनलिकेला वर्षभर पाणी राहिल्याने यावर्षी टँकरची गरज भासली नाही.
२३मायणी
पाचवड (ता. खटाव) येथील ह.भ.प. माणिक महाराज यांनी श्रमदानातून सीसीटी बंधारे तयार केले आहेत. (छाया: संदीप कुंभार)
===Photopath===
230521\1710-img-20210523-wa0013.jpg
===Caption===
एका वर्षात श्रमदानातून तयार केले १०७३ सीसीट बंधारे : ह.भ.प माणिक घाडगे यांचा उपक्रम : पाचवडचा डोंगर होणार पाणीदार