महाबळेश्वर : जंगलात चोरून सुरू असलेल्या गोहत्येच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावांनी पुकारलेल्या तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी झालेल्या सभेत गोहत्या व धोंडिबा आखाडे यांच्या खुनाचा तपास ‘सीआयडी’मार्फत करण्याची मागणी तहसीलदार रमेश शेंडगे यांना निवेदन देऊन करण्यात आली.गोहत्या बंदी असतानाही महाबळेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात जंगलात गोहत्या केली जात आहे. तसेच देवळी गावातील वृद्ध शेतकरी धोंडिबा आखाडे यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असताना पोलिस या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासात दिरंगाई करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलिसांच्या अशा कामगिरीच्या निषधार्थ तालुक्यातील ११० गावांतील जनतेने शुक्रवारी तालुका बंदची हाक दिली होती. या बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. ‘ जय शिवाजी जय भवानी’, ‘गोहत्याऱ्यांना अटक झालीच पाहिजे’, ‘धोंडिबा आखाडे यांच्या खुन्यांना अटक झालीच पाहिजे,’ अशा घोषणा देत हा मोर्चा छत्रपती शिवाजी चौकातून बाजारपेठ मार्गे पोलिस ठाणे, सुभाष चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रे-गार्डन, बसस्थानक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक, पंचायत समिती मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.यावेळी अनेक वक्त्यांनी बंदी असतानाही गोहत्या होतेच कशी, याबाबत आश्चर्य व्यक्त करून गोहत्या करणाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावे, धोंडिबा आखाडे यांच्या खुनाचा आणि गोहत्येचा परस्पर संबंध असून पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर पोलिसांना या दोन्ही घटनांचा तपास करता येत नसेल तर हा तपास ‘सीआयडी’कडे हस्तांतर करावा, गोवंश विक्री करणारे दलालांचा सुळसुळाट झाला असून, पोलिसांनी या दलालांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.मोर्चात माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे, गणेश उतेकर, राजेश कुंभारदरे, हरिभाऊ संकपाळ, यशवंत घाडगे, संदीप आखाडे, गोपाळ वागदरे, विजय नायडू, शांताराम धनावडे, संतोष जाधव, विजय भिलारे, दिलीप लांगी, रवींद्र शिंदे, सचिन वागदरे, शंकर ढेबे, सुभाष कारंडे, आनंद धनावडे, राम सपकाळ, विशाल सपकाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
गोहत्या निषेधार्थ ११० गावे रस्त्यावर
By admin | Published: March 31, 2017 11:02 PM